Pune Crime News | ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीसाठी एवढा दारूसाठा आला कुठून?; प्रमुख आयोजकांची पोलिसांकडून कसून चौकशी

Pune Crime News | Where did such a massive stock of liquor for the 'Project X' party come from? Police grilling the main organizers.

पुणे : Pune Crime News | तुळापूर परिसरात उघडकीस आलेल्या बहुचर्चित ‘प्रोजेक्ट एक्स’ हाउस पार्टीप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी प्रमुख आयोजकांपैकी यश राजा चौधरी याच्यासह दोघांची सखोल चौकशी केली. पार्टीमागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्याबरोबरच, जप्त करण्यात आलेल्या मोठ्या मद्यसाठ्याचा पुरवठा नेमका कुठून झाला, याचाही स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुळापूर येथील एका आलिशान बंगल्यात ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने हाउस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीवर छापा टाकल्यानंतर सात आयोजकांसह ७८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान नऊ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या मद्याच्या बाटल्या, प्रतिबंधित हुक्का साहित्य आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.

तपासादरम्यान पोलिसांनी दोन प्रमुख आयोजकांना चौकशीसाठी बोलावून पार्टीचे नियोजन कधी आणि कसे करण्यात आले, सहभागींची निवड कशा पद्धतीने झाली, प्रवेशासाठी शुल्क आकारण्यात आले होते का, तसेच या आयोजनामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, याबाबत माहिती घेतली.

१५६ जण उपस्थित, मग कारवाई फक्त ७८ जणांवरच का?

दरम्यान, या कथित रेव्ह पार्टी प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पार्टीस्थळी तब्बल १५६ तरुण-तरुणी उपस्थित असताना केवळ ७८ जणांविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आल्याने उर्वरित ७८ जणांना कोणाच्या आदेशावरून रातोरात सोडून देण्यात आले का, असा सवाल त्यांनी केला आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही याच मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत कारवाईतील विसंगतीबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

You may have missed