Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा

Gold

पुणे :   Gold-Silver Price Today | जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत धोरणात्मक बदलांमुळे भारतीय सराफा बाजारात आज सोमवार, ८ जून २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांतील तेजीला ब्रेक लागल्यामुळे दागिने खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी आता खरेदीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे केलेले आवाहन आणि सरकारने मौल्यवान धातूंवर दुप्पट केलेले आयात शुल्क या दोन्ही घटकांचा मोठा परिणाम आता बाजारपेठेवर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. परिणामी, दोन्ही मौल्यवान धातूंचे दर मोठ्या प्रमाणावर गडगडले आहेत.

‘इंडियन बुलियन’ वेबसाईटनुसार, आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत प्रति तोळा (१० ग्रॅम) तब्बल १८९० रुपयांनी कोसळली असून, आता सोन्याचा दर १,५३,८७० रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे, १,८०,००० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सोने सध्या तब्बल २७,००० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. मागील संपूर्ण आठवड्याचा विचार केला तर सोन्याच्या किमतीत ३.३४ टक्क्यांची घसरण झाली असून आठवडाभरात एक तोळ्याचे दर ५३२० रुपयांनी कमी झाले आहेत.

सोन्यासोबतच चांदीच्या किमतींनाही आज मोठा फटका बसला असून चांदी दर ६१०० रुपयांनी आपटले आहेत. या घसरणीमुळे बाजारपेठेत सध्या प्रति किलो चांदीचा दर २४३,०१० रुपयांवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात चांदीच्या दरात ९.१२ टक्क्यांची प्रचंड घसरण नोंदवली गेली, ज्या मुळे अवघ्या एका आठवड्यात चांदी तब्बल २४,३८० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आगामी काळातही या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

You may have missed