Tuljapur Darshan | तुळजाभवानी मंदिरात भाविकांना 22 तास दर्शन; गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

Tulja Bhavani

तुळजापूर : Tuljapur Darshan | तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरामध्ये सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची अलोट गर्दी होत आहे. अनेकदा तासनतास रांगेत उभे राहूनही दर्शन न मिळाल्याने भाविकांना केवळ मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागत होते. भाविकांची हीच गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत वाढ करण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, ८ जून ते १४ जून या कालावधीत तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी तब्बल २२ तास खुले राहणार आहे.

या बदललेल्या वेळेनुसार, नेहमी पहाटे ४ वाजता उघडणारे मंदिर आता रात्री १ वाजताच उघडले जाईल. रात्री १ वाजता ‘चरणतीर्थ’ पूजेने मंदिराची सुरुवात होईल आणि त्यानंतर भाविकांना मुख्य गाभाऱ्यातून दर्शन घेता येईल. परंपरेनुसार सकाळी ६ वाजता ‘अभिषेक घाट’ होऊन पंचामृत अभिषेकास प्रारंभ होईल, म्हणजेच अभिषेकाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिवसभर दर्शनाची प्रक्रिया सुरू राहून रात्री ११ वाजता मंदिर बंद केले जाईल.

या नवीन वेळापत्रकामुळे दररोज रात्री ११ ते रात्री १ या केवळ २ तासांच्या कालावधीत मंदिर स्वच्छतेसाठी बंद राहील आणि उर्वरित २२ तास भाविकांना थेट गाभाऱ्यातून भवानी मातेचे मुखदर्शन अगदी सुलभतेने घेता येईल. तहसीलदार तथा मंदिर प्रशासन अधिकारी माया माने यांनी सर्व स्थानिक पुजारी, सेवेकरी आणि देशभरातून येणाऱ्या देवीभक्तांना या बदललेल्या वेळेची नोंद घेण्याचे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

You may have missed