Rajendra Jain | सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी; सुनील तटकरेंची अधिकृत घोषणा

Rajendra Jain | Rajendra Jain nominated by NCP to replace Sunetra Pawar in Rajya Sabha; Sunil Tatkare's official announcement

मुंबई : Rajendra Jain | अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मोठे धक्कातंत्र खेळत अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.

या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ किंवा नवनीत राणा यांच्या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, पक्षाने सर्वांनाच चकवा देत ऐनवेळी विदर्भातील निष्ठावान चेहऱ्याला संधी देऊन मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी म्हणून ओळखले जातात. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. जैन यांनी यापूर्वी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षाचे निरीक्षक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली असून, ते पक्षाचे महत्त्वाचे संघटक मानले जातात. छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना अचानक जैन यांना मिळालेल्या या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार गटाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

You may have missed