Pune Crime News | शेअर मार्केटमधील तोटा भरुन काढण्यासाठी मित्राकडून 182 ग्रॅमचे दागिने घेऊन महाविद्यालयीन तरुणाने मामाच्या साथीने दागिन्यांचा अपहार करुन केली फसवणूक
पुणे : Pune Crime News | शेअर मार्केटमधील तोटा भरुन काढून परत आणून देतो, असे सांगून २० वर्षाच्या महाविद्यालयीन मुलाने मामाच्या साथीने मित्राकडून २७ लाख ३० हजार रुपयांचे (आताच्या बाजार भावानुसार) १८२ ग्रॅम दागिने घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका २० वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तेजस तानाजी काटकर Tejas Tanhaji Katkar (वय २०, रा. वडगाव मावळ) व त्याचा मामा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फेब्रुवारी २०२६ पासून आतापर्यंत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तेजस काटकर हे दोघे आंबेगाव येथील एअर क्राप्ट मेंटनन्स इंजिनिअरींगमध्ये प्रथम वर्षात शिकत आहेत. तेजस व फिर्यादी हे चांगले मित्र झाले. तेजस हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणे व ट्रेडिंग करणे यात आपला वेळ घालवत असतो. फिर्यादी याला तो शेअर मार्केट शिकुन घे, खूप फायदा असतो, असे सांगत असे. फिर्यादी तरुणाला शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यायचे असल्याने तो त्याला विरोध करत होता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्याने आपण आपल्या शिक्षणाचा खर्च स्वत: भागवु शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांनाही आपण पैसे कमावुन देऊ शकतो, असे नेहमी म्हणत असे. त्याच्या अशा सांगण्यावरुन फिर्यादी तरुण त्याच्याकडून शेअर मार्केटिंगबद्दल माहिती घेऊ लागला.
तेजस काटकर हा फॉरेक्स मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करत असल्याने रोजच्या रोज त्याला त्यामधून फायदा होत असल्याचे मोबाईलमधील अॅपमधून दाखवत होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये तेजस काटकर हा फिर्यादीला भेटल्यावर त्याने फॉरेक्स या शेअर मार्केटिंगमध्ये तोटा झाल्याचे व अजून थोडी गुंतवणुक केल्यास निश्चित फायदा होईल, असे सांगितले. फिर्यादी कडे पैसे मागितले. फिर्यादी याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने दागिने मिळाले तर ते गहाण ठेवून ते पैसे गुंतवून थोड्या दिवसात दागिने सोडवून आणून परत देतो, असे सांगितले. फिर्यादीने आपल्या आईला हे सांगितले़ मुलाची मित्राची अडचण दूर करण्यासाठी तिने सोन्याचा राणी हार, नेकलेस असे ५५ ग्रॅम वजनाचे दागिने फिर्यादीकडे दिले. त्याने तेजस काटकर याला तळेगाव दाभाडे येथे नेऊन दिले.
त्यावेळी तेथे तेजसचा मामा होता़ मामाच हे दागिने गहाण ठेवणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तेजसने आठवड्याभरात दागिने परत करतो, असे सांगितले. आठवड्याभरानंतर तेजस काटकर याने पुन्हा शेअर मार्केटमध्ये तोटा झाला आहे, आणखी काहीतरी कर, आपण अजून पैसे गुंतवले तरच प्रॉफिट होईल व दागिने सोडवता येतील, असे सांगितले. त्यामुळे जुने दागिने सोडवुन आणण्यासाठी फिर्यादीने त्याच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या, कानातील झुमके, पदक, पोत असे दागिने तेजसच्या हवाली केले. प्रॉफिट झाला की लवकरच दागिने परत देतो, असे तेजस सांगत होता. दागिने देतो देतो, असे म्हणत आहे. परंतु, दागिने परत केले नाही. शेवटी या महाविद्यालयीन तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली़ जवळपास १८२ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांचा (आजच्या बाजारभावानुसार २७ लाख ३० हजार रुपये) अपहार करुन फसवणूक केल्याची फिर्याद या महाविद्यालयीन मुलाने दिली आहे. तेजस काटकर याला चौकशीसाठी बोलावले होते, त्याने येतो, असे सांगितले पण, चौकशीला आला नाही़ त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी सांगितले.
