Pune Crime News | जनगणना करणार्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करुन मुलाला दगडाने मारहाण करुन केले जखमी
पुणे : Pune Crime News | गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत जनगणना करण्यासाठी गेलेल्या महिलेशी वाद घालून तिचा विनयभंग करण्यात आला. महिलेच्या मुलाला हाताने, दगडाने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विकास नवनाथ मोरे (Vikas Navnath More), क्रांती विकास मोरे (वय ३६), मुक्ता राजाभाऊ कसबे (वय ४३), लिलावती नवनाथ मोरे (वय ६५), अभिजित श्रीधर मोरे Abhijit Shridhar More (वय २६, सर्व रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) व त्यांचे ५ साथीदार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना २७ व २८ मे रोजी दुपारी घडली आहे. याबाबत एका ४८ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची जनगणना कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या २७ मे रोजी दुपारी ३ वाजता मिनाताई ठाकरे वसाहतीतील ब्लॉक नंबर २१६मधील गल्ली नंबर १४ या ठिकाणी विकास नवनाथ मोरे यांच्या घरासमोर जनगणना कामासाठी गेल्या होत्या. त्यांचे घर व घरातील प्रमुखाची माहिती त्यांनी नोंद करुन घेतली. मोरे याचे याच वसाहतीत दुसरे घर आहे. मोरे यांचे म्हणणे होते की त्या घराचीही नोंदणी करा. तेव्हा त्यांनी त्या घराची नोंद झाली असल्याचे सांगितले. तरीही त्याचे समाधान झाले नाही. त्याने या महिलेला शिवीगाळ करुन पुढे काम करण्यास अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्या दिवशी त्या परत गेल्या.
जनगणनेच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी त्या २८ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पुन्हा त्या गल्लीत गेल्या. तेव्हा आदल्या दिवशीच्या भांडणाचा राग मनात धरुन विकास मोरे, त्याची पत्नी क्रांती मोरे, बहिण मुक्ता कसबे, आई लिलावती मोरे, पुतण्या अभिजित मोरे या सर्वांनी त्यांना शिवीगाळ करुन बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यांच्या सोबत इतर पाच महिला व पुरुषांनी अचानक पाठीमागून येऊन या महिलेला तसेच तिच्या मुलाला हाताने, दगडाने मारहाण करुन खाली पाडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दुखापत केली. विकास मोरे याने या महिलेचा हात धरुन त्यांच्या ब्लाऊजची डावी बाही फाडून लज्जास्पद वर्तन केले. त्यांचा मोबाईल, घड्याळ, गळ्यातील माळेला हिसका दिला. स्वारगेट पोलिसांनी विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट तपास करीत आहेत.
