Import Duties On Gold And Silver | सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ; गुंतवणूकदारांसमोर आता पेच, पाहा काय आहेत नवे बदल
नवी दिल्ली : Import Duties On Gold And Silver | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, केंद्र सरकारने आता एक ठोस पाऊल उचलले आहे. देशातील सोन्याचा खप कमी करण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा वाचवण्यासाठी सरकारने सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी उसळी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, सामान्य ग्राहकांच्या खिशाला याचा थेट फटका बसणार आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव आधीच अस्थिर आहेत. अशातच भारताने आयात शुल्क वाढवल्यामुळे देशांतर्गत बाजारात १० ग्रॅम सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ सोन्याची दागिनेच नाही, तर चांदीच्या वस्तूही महाग होणार आहेत.
या बदलत्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्याकडे आधीपासून सोने असेल, तर या दरवाढीमुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढणार आहे. मात्र, नवीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही वेळ काहीशी आव्हानात्मक आहे. तज्ज्ञांनी सध्या घाईने मोठी खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याऐवजी ‘डिजिटल गोल्ड’ किंवा ‘गोल्ड ईटीएफ’ मध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते, कारण त्यावर प्रत्यक्ष सोन्याच्या तुलनेत घडणावळीचा बोजा नसतो.
एकूणच, सोन्याची आयात कमी करून रुपयाला बळकटी देण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. मात्र, लग्नसराईच्या काळात ही दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडणार आहे. येत्या काही दिवसांत जागतिक घडामोडींनुसार हे दर कसे राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
