Pune Weather News | पुण्यात हंगामातील नीचांकी 17.4 अंश तापमानाची नोंद; सकाळी गुलाबी थंडीची चाहूल, गुरुवारी पावसाची शक्यता!
पुणे : Pune Weather News | दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना सोमवारी सकाळी गुलाबी थंडीचा सुखद अनुभव आला. शहरात या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात पुण्यात हिवाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात १५.६ अंश सेल्सिअस, तर हवेली परिसरात १५.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, गुरुवारी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून पुणेकरांना तीव्र उन्हाचा तडाखा आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पहाटे आणि सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवू लागल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सोमवारी सकाळीही वातावरणात सुखद गारठा जाणवत होता. मात्र, दुपारी बारानंतर उन्हाची तीव्रता वाढली आणि सायंकाळपर्यंत उकाडा कायम राहिला.
दरम्यान, दिवाळी जवळ येत असताना यंदा सणासुदीच्या काळात थंडीचा जोर वाढणार का, याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
