Kondhwa Pune Crime News | कोंढवा : मोबाईल खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे EMI थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ज्येष्ठाला मारहाण

Crime

पुणे : Kondhwa Pune Crime News | मोबाईल खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोंढवा परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारात त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप असून कोंढवा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी इद्रीस सैफुद्दीन सायकलवाला (वय 59, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही घटना 26 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारदारांच्या मुलाने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन मोबाइल खरेदी केला होता. मात्र काही हप्ते थकले असल्याने वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी घरात येऊन वाद घातल्याचा आरोप आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत कानशिलात मारले.

तसेच घराच्या दरवाजावर जोरात लाथ मारल्याने तक्रारदारांच्या डोळ्याला दुखापत झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिसांकडून सुरू आहे.

You may have missed