Pune Crime News | पुणे : वनराज आंदेकरच्या खुनाच्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर कोयत्याने वार आणि पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या आरोपींनी हल्ल्यानंतर कपडे बदलल्याचे उघड
पुणे : Pune Crime News | वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर बालाजीनगर येथे कोयत्याने हल्ला आणि पिस्तुलातून गोळीबार केल्यानंतर पसार झालेल्या आंदेकर टोळीतील संशयितांनी हल्ल्यानंतर एका कपड्यांच्या दुकानातून नवीन कपडे खरेदी करून कपडे बदलल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. आरोपींमधील चर्चा आणि हालचाली दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून पोलिसांनी त्याचे विश्लेषण सुरू केले आहे.
गुरुवारी सकाळी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात झालेल्या या हल्ल्यात अक्षय उर्फ बाळू म्हस्के गंभीर जखमी झाला. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान हल्लेखोर कपडे बदलण्यासाठी दुकानात गेल्याचे उघड झाले असून, कपड्यांचे बिल भरलेल्या एका व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत. तसेच आरोपींनी समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधल्याची माहिती समोर आली असून त्याबाबतही तपास सुरू आहे.
पोलिसांच्या मते, आरोपींनी हल्ल्यापूर्वी जखमीवर पाळत ठेवली होती. गुन्ह्यात वापरण्यात आलेली विना क्रमांकाची दुचाकी, आरोपींच्या हालचाली आणि त्यांच्या पुढील संभाव्य लक्ष्याबाबतही तपास सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
