Lokadalat DRT Pune | कर्ज वसुली न्यायाधिकरणाकडून लोक अदालतीत तब्बल 143 कोटींची वसुली, 306 प्रकरणांचा केला निपटारा
पुणे : Lokadalat DRT Pune | कर्ज वसुली न्यायाधिकरणाने (डीआरटी) राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सार्वजनिक निधीच्या १४३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची वसुली केली आहे. या लोकअदालतीमध्ये ३०६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
डीआरटी पुणे चे अध्यक्ष दिलीप मुरुमकर यांच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत पार पडली. यामध्ये अॅड. झेनिया एस इराणी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश अभय सिरसीकर, अॅड. ऐश्वर्या नाणेकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश के बी काटके, अॅड. अंकित वाघमोडे, रिकव्हरी ऑफिसर रविकांत यादव, अॅड. भक्ती रोकडे आदी वेगवेगळ्या पॅनेलमध्ये सहभागी झाले होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन निबंधक अजय कुमार साहू, सहायक निबंधक सूर्यकांत प्रकाश निकम, रिकव्हरी ऑफिसर विनय सक्सेना, प्रभारी विभाग अधिकारी मनजीत कौर तसेच डीआरटीच्या सर्व कर्मचार्यांनी केले.
या लोक अदालतीत एकूण २३१ कोटी रुपयांच्या ३१४ प्रकरणांची सुनावणीसाठी नोंद करण्यात आली होती. त्यातील ३०६ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला. आणि १४३ कोटी रुपयांची सेटलमेंटला मान्यता देण्यात आली. ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांनी संपूर्ण सहकार्य केले.
पुणे डीआरटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. त्र्यंबके, उपाध्यक्ष अॅड. प्रदीप यादव, सचिव अॅड. पवनकुमार पाठक, अॅड. प्रिती भट्ट, अॅड. सागर भांडवलकर तसेच इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक तसेच इतर बँकांच्या अधिकार्यांनी लोकअदालतीत सक्रिय सहभाग घेतला. त्यापैकी बँक ऑफ इंडियाने एकट्याने १८८ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केला.
डीआरटी पुणे येथे २४ डिसेंबर २०२२ रोजी पहिल्या लोकअदालतीपासून आतापर्यंत १४ राष्ट्रीय आणि २ विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या सर्व लोक अदालतीमध्ये एकूण २ हजार ६१४ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून त्यात एकूण ४ हजार १४१ कोटींची तडजोड करण्यात आली आहे.
