Maharashtra Legislative Council | विधान परिषदेत हालचालींना वेग : राज्यपाल कोट्यातील 5 जागा भरणार, राजकीय चर्चांना उधाण

vidhan parishad

मुंबई :  Maharashtra Legislative Council | राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडण्याच्या तयारीत आहे. विधान परिषदेतील रिक्त जागांबाबत हालचालींना वेग आला असून, राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातील पाच जागा लवकरच भरण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतील इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्य विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ असली, तरी सध्या केवळ ५५ सदस्य कार्यरत आहेत आणि तब्बल २३ जागा रिक्त आहेत. त्यातच येत्या १४ मे २०२६ रोजी आणखी नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत परिषदेत मोठे बदल होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. कार्यकाळ संपणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.

विधान परिषद ही कायमस्वरूपी सभा असल्याने ती बरखास्त होत नाही. सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो आणि ठराविक कालावधीनंतर टप्प्याटप्प्याने सदस्य निवृत्त होतात. परिषदेत काही सदस्य आमदार यांमार्फत निवडले जातात, काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, काही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात, तर साहित्य, कला, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जाते.

या नामनिर्देशन प्रक्रियेमुळे राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक इच्छुकांची उत्सुकता वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय असलेल्या किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून शिफारसी, भेटीगाठी आणि राजकीय लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, विधान परिषदेबरोबरच राज्यसभेच्या निवडणुकांचाही कार्यक्रम जवळ येत आहे. एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात निवडणुका, नियुक्त्या आणि राजकीय समीकरणांचे फेरबदल यांची मालिका सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच राज्यपाल कोट्यातील पाच जागांच्या नियुक्त्या आणि आगामी निवडणुका यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल आणि नवे राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

You may have missed