Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रावर दुहेरी संकट: राज्यातील 26 जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा; कुठे वादळी पाऊस, तर कुठे तीव्र उष्णतेची लाट
मुंबई : Maharashtra Weather Alert | हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्रात एकाच वेळी वादळी पाऊस आणि तीव्र उष्णतेची लाट असे दुहेरी संकट पाहायला मिळत आहे. मान्सूनपूर्व हवामान सक्रिय झाल्यामुळे हवामान खात्याने राज्यातील एकूण २६ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
एकीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा कहर कायम आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर किंवा संध्याकाळी वादळी पावसाचा अंदाज आहे. मात्र, या पावसामुळे हवेतील आर्द्रता तब्बल ८० टक्क्यांपर्यंत वाढल्याने मुंबई आणि परिसरात नागरिकांना प्रचंड उकाडा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याउलट परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये असून, तिथे तापमानाचा पारा चढलेलाच राहण्याची शक्यता आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना विशेषतः सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत विनाकारण बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याने सर्वच भागात नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले असून, विजा चमकत असताना झाडांखाली किंवा कच्च्या शेडचा आसरा न घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
