Pune Crime News | जागा विकसित केल्यानंतर आलेले पैसे गुंतवणूक म्हणून घेऊन बांधकाम व्यावसायिक रुपेश कुंबरे यांनी केली 2 कोटी 64 लाखांची फसवणूक
पुणे : Pune Crime News | जागा विकसित केल्यानंतर मुळ मालकाकडे आलेल्या फ्लॅटची विक्री करुन आलेले पैसे २ टक्के व्याजाने भांडवल म्हणून गुंतवणुक म्हणून घेतली. त्यानंतर कोणताही परतावा न देता, हात पाय तोडून कार्यक्रम करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरुड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक पती पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मनोहर ऊर्फ मनोज अबुराव दगडे (वय ५४, रा. आर के ग्रेसिया, अरिहंत कॉलेजजवळ, उत्तमनगर, बावधन) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आर के लाईफ स्पेस डेव्हलपर्सचे (RK Life Space Developers) भागीदार रुपेश हरीभाऊ कुंबरे Rupesh Haribhau Kumber (वय ४५) आणि कांचन रुपेश कुंबरे Kanchan Rupesh Kumber (वय ४३, दोघे रा. ऋषिकेश, आझादनगर, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुडमधील आझादनगर येथे २०११ ते २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर दगडे यांची वडिलोपार्जित जमीन बावधन येथे होती. त्यांनी ही जागा विकसित करण्यासाठी आर के लाईफ स्पेस डेव्हलपर्सचे रुपेश कुंबरे यांच्याशी करारनामा करुन दिली. तेथे १२ मजली दोन इमारती उभ्या राहिल्या. फिर्यादी यांच्या वाटणीला आलेले फ्लॅट जास्त दराने विक्री करुन देण्याचे कुलमुखत्यार पत्र कुंबरे यांनी लिहून घेतले. फिर्यादी यांच्या वाटणीला आलेल्या पैकी तीन फ्लॅटची विक्री करुन एकूण २ कोटी ६४ लाख रुपये रक्कम आली. ती रक्कम कुंबरे याने स्वत: कडे ठेवली. ही रक्कम पुन्हा त्याचे कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास दरमहा २ टक्के परतावा देईन, असे आश्वासन दिले. त्यांनी त्याला संमती दिल्यानंतर या रक्कमेवर कोणताही परतावा दिला नाही. मुळ रक्कम परत केली नाही. फिर्यादी दगडे यांनी पैशांची मागणी केल्यावर त्यांना ‘‘तुला कोठे जायचे आहे तेथे जा, आम्ही कोणालाही घाबरत नाही़ तुम्हाला लय माज आला असेल, तर या पैसे मागायला हात पाय मोडुन तुझा कार्यक्रम करतो़’’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच चिठ्ठीत नाव लिहून मी फाशी घेईन, अशी धमकी देऊन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.
