Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रावर हवामानाचे दुहेरी संकट; विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट, तर कोकण-पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा
पुणे : Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू असतानाच हवामानाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. राज्याला सध्या एकाच वेळी तीव्र उष्णता आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत सूर्य आग ओकत असून तेथे उष्णतेच्या लाटेचा कडक इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला. आज राज्यातील वेगवेगळ्या भागांत कमाल तापमान ३०°C पासून अगदी ४४°C पर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई आणि आसपासच्या ठाणे, पालघर परिसरात आज मुख्यत्वे कोरडे पण प्रचंड दमट हवामान असेल, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उकाडा सहन करावा लागणार आहे. येथील तापमान ३० ते ३३ अंशांच्या आसपास राहील. मात्र, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज हवामान अचानक बदलणार असून तेथे ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास अवकाळी पावसाचे राहतील. विशेषतः सातारा आणि कोल्हापूर भागात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात कमाल तापमान ३५°C ते ४०°C दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत मात्र कडक ऊन असेल आणि तापमान ३८°C ते ४२°C पर्यंत पोहोचेल. येथे मुख्यतः हवामान कोरडे राहिले तरी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक पाऊस पडू शकतो.
मराठवाडा आणि विदर्भात सध्या उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात हवामान अतिशय उष्ण व कोरडे राहील. मात्र, याच विभागातील बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसोबतच अवकाळी पावसाचीही शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज तापमान ३८°C ते ४३°C च्या दरम्यान नोंदवले जाऊ शकते. या वाढत्या तापमानामुळे आणि बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी, विशेषतः १२ ते ४ या वेळेत, अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सतत पाणी प्यावे आणि वादळ-वारा सुरू झाल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
