Pune PMC News | केशवनगरमधील दोन प्रकल्प बंद तर दोन प्रकल्प अपुर्ण क्षमतेने कार्यरत; शहरात सार्वजनिक ठिकाणी कचर्याचे साम्राज्य
मर्जीतल्या ठेकेदारांसाठी कचर्याची कृत्रिम समस्या – कॉंग्रेसचा आरोप
पुणे : Pune PMC News | केशवनगर येथील कचर्यावर प्रक्रिया करणारे सुमारे १५० टन क्षमतेचे प्रकल्प मागील काही दिवसांपासून बंद आहेत. दुसरीकडे ७५० टन क्षमतेचा पूना बायो एजर्नी प्रकल्पही जेमतेम १०० मे.टन क्षमतेने सुरू आहे. शहरातील कचर्याचे प्रमाण वाढत असताना हे प्रकल्प बंद असल्याने शहरात कचरा साठून असल्याची कबुली प्रशासनाने दिली. बंद असलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अतिरिक्त कचर्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आल्याचेही अधिकार्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे टेंडर ठरावीक ठेकेदाराला देण्यासाठी शहरात कचर्याची कृत्रिम समस्या निर्माण केल्याचा आरोप केला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे कोथरूड परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरल्याकडे लक्ष वेधले. विरोधी पक्षनेते ऍड. निलेश निकम,वासंती जाधव, दत्ता बहिरट, महेश वाबळे, योगेश मुळीक, सुरेखा कवडे , कोमल नवले, अश्विनी लांडगे यांनी देखिल कचर्याच्या समस्येवकर टीका करताना बंद असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरसेवक अरविंद शिंदे आणि प्रशांत जगताप यांनी कचरा माफियांसाठी जाणीव पूर्वक कचरा साठविला जात आहे. एकाच कंपनीला काम देण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यातूनच ही कचरा समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप केला.
सर्वसाधारण सभेनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची भेट घेउन कचर्याच्या समस्येबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले, केशवनगर येथील साईराम आणि नेफ्रा कंपनीचे सुमारे १५० टन क्षमतेचे दोन प्रक्रिया प्रकल्प अनुक्रमे क्षमता वाढ आणि यांत्रिक दुरूस्ती अभावी बंद आहेत. रामटेकडी येथील ७५० टन क्षमतेचा मे. पूना बायो एनर्जी या प्रकल्पातही गेली काही महिने सुरु असलेले २०० टन प्रक्रियेचे काम १०० टनांवर येउन थांबले आहे. सूस येथील ओल्यापासून इंधन निर्मितीचा २०० टन क्षमतेचा नोबल कंपनीचा प्रकल्प जेमतेम ४० टन क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचर्याची समस्या निर्माण झाली आहे, ही वस्तु स्थिती आहे. सध्या शहरात निर्माण होणार्या अकराशे टन ओल्या कचर्यापैकी फक्त ४०० टन कचर्यावर प्रक्रिया होते. उर्वरीत ७०० टन कचरा शेतीसाठी देण्यात येतो. पूना बायो एनर्जी कंपनीचा प्रकल्प लवकरच पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ं संतोष वारूळे म्हणाले, मागील काही काळात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे देखिल काही प्रकल्पांमध्ये प्रक्रियेचे काम खंडीत होउन कचर्याची समस्या निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. बंद असलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत कचर्याची समस्या कमी करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अतिरिक्त कचर्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. लवकरात लवकर कचर्याची समस्या कमी करण्यात येईल.
