Manoj Jarange Patil | ‘फडणवीसांची भूमिका द्वेषाने भरलेली, मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलंय; मनोज जरांगे पाटील
जालना : Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर शब्दांत निशाणा साधला आहे. अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर मराठा समाजाच्या फसवणुकीचा आणि वेळकाढूपणाचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांना निवडणुका जिंकण्यासाठी मराठ्यांची मते हवी असतात आणि महाराष्ट्रात त्यांचेच नेते लागतात, मात्र त्याच मराठ्यांची लेकरे मोठी होऊ नयेत अशी त्यांची द्वेषाने भरलेली भूमिका आहे, असा थेट ठपका जरांगे पाटील यांनी ठेवला आहे. सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाचे वाटोळे करत असल्याचेही ते म्हणाले.
शासनाने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे आता आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची नेमकी तारीख आणि त्याचे स्वरूप निश्चित केले जाणार असून, मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपल्या मागण्यांचा पाढा वाचताना जरांगे पाटील यांनी सरकारला काही तिखट प्रश्न विचारले आहेत. आठ महिने उलटून गेले तरी कुणबी प्रमाणपत्रे का मिळाली नाहीत, तसेच सातारा संस्थानचा जीआर (सातारा गॅझेट) एका महिन्यात काढण्याचे वचन दिले होते त्याचे काय झाले, असा जाब त्यांनी विचारला आहे. यासोबतच, राज्यभरातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने अद्याप पाळले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
न्यायमूर्ती शिंदे समितीची मुदत केवळ कागदावर वाढवली जात असून, ही समिती हैदराबाद गॅझेट आणि जुन्या कुणबी नोंदी शोधण्यात जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. आज अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील कोणती मोठी घोषणा करतात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.
