NEET Paper Leak Case | नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून महिला लेक्चरर अटकेत; सीबीआय तपासात मोठे कनेक्शन उघड

NEET Paper Leak Case | Female lecturer arrested from Pune in NEET paper leak case; CBI investigation reveals major connection

पुणे : NEET Paper Leak Case |  नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. जीवशास्त्र विषय शिकवणाऱ्या लेक्चरर मनिषा मांढरे यांना सीबीआयने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे पुण्यासह राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी आज सकाळी पुण्यातील मनिषा मांढरे (Manisha Gurunath Mandhare) यांच्या निवासस्थानी छापा टाकला. काही तास चौकशी केल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आले आणि तेथे अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांसह सीबीआयची विशेष टीम तपास करत आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मनिषा मांढरे या एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीशी संबंधित होत्या. सीबीआयने दिल्लीत कमिटी सदस्यांच्या चौकशीदरम्यान त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा केला आहे. पी. व्ही. कुलकर्णीप्रमाणेच त्यांनीही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची माहिती दिली असावी, असा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचे सीबीआय सूत्रांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात एनटीएची संपूर्ण पेपर सेटिंग कमिटी सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. काही सदस्यांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पुढील काळात आणखी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या तपासाला आता अधिक गती मिळाली आहे.

या अटकेची बातमी समोर येताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. मनिषा मांढरे या पुण्यातील एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये जीवशास्त्र शिकवत होत्या. त्यांच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांपर्यंत संवेदनशील माहिती पोहोचली असावी, असा प्राथमिक तपासात संशय व्यक्त केला जात आहे.

या तपासात आणखी एक धक्कादायक कनेक्शन समोर आले आहे. आधी अटक करण्यात आलेल्या मनिषा वाघमारे आणि आता अटक झालेल्या मनिषा मांढरे या दोघीही पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एकाच इमारतीत राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. एका विंगमध्ये मनिषा मांढरे, तर दुसऱ्या विंगमध्ये मनिषा वाघमारे राहत असल्याचे सांगितले जात आहे. दोघी मैत्रिणी असल्याचीही चर्चा असून, त्यामुळे पेपरफुटी प्रकरणातील त्यांचे कथित कनेक्शन अधिक चर्चेत आले आहे.

मनिषा मांढरे या गेल्या २४ वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या मॉडर्न कॉलेजमध्ये काम करत होत्या, तसेच मागील पाच वर्षांपासून एनटीएच्या पॅनलवरही कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयकडून या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, लवकरच आणखी काही महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

You may have missed