Pune Crime News | पुणे : रिक्षा चोरीचे दोन गुन्हे उघड, आरोपीकडून दोन रिक्षा जप्त; मुंढवा पोलिसांची कामगिरी
पुणे : Pune Crime News | मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पेट्रोलिंगदरम्यान संशयित रिक्षाचालकाला ताब्यात घेत केलेल्या चौकशीत रिक्षा चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. आरोपीकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव यांना रिक्षा चालवत जाणारा एक व्यक्ती संशयास्पद वाटला. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव सतीश तानाजी देवारे Satish Tanaji Devare (वय ४०, रा. शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) असे सांगितले.
रिक्षेबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्याला मुंढवा पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली. चौकशीत संबंधित रिक्षा घोरपडी परिसरातून चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात ही रिक्षा मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २९९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) मधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आणखी एक रिक्षा चोरी केल्याची माहिती समोर आली. त्या आधारे पोलिसांनी दुसरी रिक्षाही जप्त केली. ही रिक्षा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १८५/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) शी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले.
अशा प्रकारे मुंढवा पोलिसांनी रिक्षा चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून दोन रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त झोन ५ जीवन बेनिवाल, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, चेतन गायकवाड, योगेश गायकवाड, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, राहुल मोरे, किरण बनसोडे, स्वप्नील रासकर, अक्षय धुमाळ, योगेश राऊत, सलीम अत्तार यांच्यासह मुंढवा पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.
