MHADA Pune News | म्हाडाच्या पुण्यातील 4,462 सदनिकांसाठी अर्जाला महिनाभर मुदतवाढ; आता 15 ऑक्टोबरपर्यंत संधी
पुणे : MHADA Pune News | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) ४ हजार ४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत एक महिन्याने वाढवली आहे. अर्जदारांना आता १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.
उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि प्राप्तिकर विवरणपत्र यांची ऑनलाइन पडताळणी होण्यास विलंब होत असल्याने म्हाडाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाने १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.
अर्ज करण्यासाठी सुरुवातीला १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत थेट एक महिन्याने वाढवून १५ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.
मूळ वेळापत्रकानुसार संगणकीय सोडत १३ ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र, अर्जाची अंतिम मुदतच १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आल्याने पुढील सर्व प्रक्रियेचे वेळापत्रक बदलणार आहे.
अनामत रक्कम भरण्याची मुदत, पात्र अर्जदारांची प्रारूप आणि अंतिम यादी तसेच संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे पुणे मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
