Pune Crime News | बनावट मृत्युपत्र तयार करुन महिलेची कोट्यावधीची मालमत्ता बळकविण्याचा प्रयत्न करणार्या भाडेकरु रमेश रामचंद्र कुलकर्णी विरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पुण्यात अनेक महिला, पुरुष हे एकटे रहात असतात. शासकीय कर्मचारी असल्यास त्यांना निवृत्त वेतन व केंद्रीय आरोग्य हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळत असतात. परंतु, ते आपल्यानंतर मालमत्तेच काय करायचे याचा विचार करुन मृत्युपत्र तयार करत नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन हॉस्टेल चालविण्यापुरते भाडेकरु म्हणून घेतले असताना त्याने जुन्या तारखेचे बनावट मृत्युपत्र तयार करुन कोट्यावधीची मालमत्ता बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत बेबी गोविंद देशपांडे (वय ७६, रा. यशश्री सोसायटी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रमेश रामचंद्र कुलकर्णी Ramesh Ramchandra Kulkarni (वय ३१, रा. तृप्ती बंगला, पौड रोड, मोरे विद्यालयाजवळ, कोथरुड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुडमधील यशश्री सोसायटीमधील बंगल्यात १ जुलै २०१८ ते ३० जून २०२३ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी देशपांडे आणि त्यांची मोठी बहिण शालिनी देशपांडे या दोघी सख्या बहिणी असून त्यांनी विवाह केला नाही. शालिनी देशपांडे यांनी केंद्रीय शासकीय सेवेत नोकरी करुन रिटायर्ड झाल्या. त्यानंतर त्यांनी वकिली व्यवसाय केला. फिर्यादी या स्वत: डिफेन्स अकाऊंटस मध्ये ६० वर्षांपर्यंत नोकरी केली. त्यांनी एकमेकांना मदत करीत आत्या, मामा मामी व इतर नातेवाईक त्यांच्याकडे राहत होते. त्यांनी लहान भाऊ विद्याधर याच्या तीन मुलींचे शिक्षण केले. त्या बंगल्यात स्वत: होस्टेल चालवत होत्या. वयोमानानुसार त्यांना ताण होऊ लागल्याने त्यांनी रमेश कुलकर्णी याच्याशी १७ मे २०१८ मध्ये ५ वर्षाकरीता लिव्ह अॅन्ड लायसन्सने करार करुन त्याला होस्टेल चालविण्यास दिले.
रमेश कुलकर्णी याने बंगल्यामध्ये त्याच्या मनाप्रमाणे खोल्या बनवल्या. त्यासाठी त्यांना अनावश्यक खर्चाला भाग पाडले. १ एप्रिल २०२० पासून त्याने भाड्याचे पैसे दिले नाही. तेव्हा शालिनी यांनी त्याला दोनदा नोटिस पाठविल्या. त्याच्याविरुद्ध कोथरुड पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या. कोरोनाची बाधा झाल्याने शालिनी देशपांडे यांचे २७ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर रमेश कुलकर्णी याने शालिनी देशपांडे यांची सर्व स्थावर मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न सुरु केला. शालिनी देशपांडे यांच्या नावावर कोथरुड येथील यशश्री सोसायटीमधील बंगला, कोथरुडमधील हेरंब सोसायटीमधील एक फ्लॅट, बावधन येथील धनश्री अपार्टमेंटमधील सदनिका, कार्ला येथील बंगला अशा ४ स्थावर मालमत्ता आहे. शालिनी यांना एकूण ८ वारसदार आहेत. फिर्यादी यांनी दिवाणी न्यायालयात हेअरशिप सर्टिफिकेट मिळविण्यासाठी दिवाणी दावा केला आहे. त्यात रमेश कुलकर्णी याने त्रसस्थ म्हणून स्वत:ला समाविष्ट करावे या करीता अर्ज दाखल केला होता. परंतु, त्याने ११ डिसेंबर २०२४ पर्यंत मृत्युपत्र सादर न केल्यामुळे कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला.
रमेश कुलकर्णी याने त्यानंतर शालिनी यांचे बनावट मृत्युपत्र तयार केल्याचे प्रयत्न सुरु केले. शालिनी यांच्या हेरंब सोसायटीतील फ्लॅट बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्याची कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर रमेश कुलकर्णी याने बनावट मृत्युपत्र तयार केल्याचे व ते रहात असलेली मिळकत विकण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यांनी हे मृत्युपत्र मिळवले. त्याचे निरीक्षण केल्यावर त्यात अनेक बनावट बाबी असल्याचे दिसून आले. मृत्युपत्राला लावलेला स्टॅम्प पेपर हा २०१५ चा आहे. मृत्युपत्र २९ नोव्हेंबर २०१६ रोजी बनविले आहे. त्यातील स्टॅम्प पेपर घेताना स्वत:शी शालिनीची सही बनावट आहे. त्यांचे मृत्युपत्रावर मागे केलेली सही तसेच मुळ सही या सर्वात प्रचंड तफावत आहे.
या मृत्युपत्रात शलिनी यांनी रमेशला मृत्युपत्र का दिले, याचा सविस्तर उल्लेख नाही. वस्तुत: शालिनी व रमेश मधील संबंध केवळ व्यावसायिक स्वरुपाचे व विलक्षण तणावपूर्ण होते. शालिनीच्या नावावरील सर्व स्थावर व जंगम मालमत्ता नॉमिनी म्हणून केवळ तिच्या कायदेशीर वारसांची नावे दिसतात. कोठेही रमेशचा साधा नामोल्लेख/ नॉमिनेशनही नाही़ असे अनेक दोष या मृत्युपत्रात असल्याचे फिर्यादी यांनी दाखवुन दिले असून त्यातील शालिनीची सही ही तज्ञांकडून तपासावी, अशी विनंती केली आहे. रमेश कुलकर्णी याने शालिनी हिचे कोणी नातेवाईक नाही असे समजून तिची मालमत्ता बळकाविण्यासाठी जुन्या तारखेचे बनावट मृत्युपत्र तयार केले. त्यावर शालिनीची बनावट सही करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख तपास करीत आहेत.
