Monsoon Updates 2026 | अखेर मॉन्सून केरळमध्ये दाखल; विदर्भासह राज्यात १५ जूनच्या आसपास आगमनाची शक्यता
Monsoon Updates 2026 | मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा मॉन्सून केरळमध्ये नियोजित वेळेपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने पोहोचला. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.
हवामान विभागाचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असून पुढील काही दिवसांत तो दक्षिण महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भात मॉन्सून १५ जूननंतरच दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. मात्र हा पाऊस मॉन्सूनपूर्व नसून अवकाळी स्वरूपाचा असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशपासून विदर्भमार्गे रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंझावाती स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भातील काही भागांत पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यांसह तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भात ढगाळ वातावरण असले तरी उकाड्याचा त्रास कायम राहणार आहे. काही भागांत तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. बुधवारी विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानात वाढ नोंदविण्यात आली. ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा येथे तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली असून पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. विदर्भात मॉन्सूनसाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून १० जूननंतर परिस्थितीचा अधिक स्पष्ट अंदाज घेता येईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
