MSRTC Maharashtra | डिझेलच्या भडक्यामुळे ‘लालपरी’चा प्रवास महागणार?; एसटी भाडेवाढीचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे संकेत

ST Bus | Big good news for ST passengers! Toilets at all bus stops in the state will be free; Corporation's big decision on the occasion of its anniversary

मुंबई : MSRTC Maharashtra | आधी दूध, मग सीएनजी आणि आता पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असतानाच, आता महागाईचा आणखी एक मोठा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा प्रवास येत्या काळात महाग होण्याची चिन्हे आहेत.

डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे एसटी महामंडळावर तब्बल १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, या वाढत्या बोजाबाहेर पडण्यासाठी एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढ करणे आता अपरिहार्य झाले आहे, असे मोठे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महागाई ज्या पद्धतीने वाढत आहे ते पाहता महामंडळ जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रशासनाला काही कटू निर्णय घ्यावेच लागतील. सध्या आम्ही तातडीने कोणतीही भाडेवाढ लागू केलेली नाही, परंतु डिझेलचे दर जर असेच चढे राहिले तर भविष्यात तिकीट दरांमध्ये वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. एसटी महामंडळ आधीच जवळपास १२,००० कोटी रुपयांच्या संचित तोट्याचा सामना करत आहे, त्यातच आता डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे महामंडळाची आर्थिक स्थिती कमालीची खालावली असून हा वाढता तोटा सतत सहन करणे आता शक्य राहिलेले नाही.

एसटी महामंडळात सध्या सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यांच्या वेळेवर पगाराची जबाबदारी महामंडळावर आहे. यासोबतच प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे आणि दररोज रस्त्यावर धावणाऱ्या १४,२५० बसेसची यंत्रणा सुरळीत चालवणे हे मोठे आव्हान आहे. राज्य सरकारकडून महिलांना प्रवासात मिळणारी ५० टक्के सूट आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा मोफत प्रवास या सवलतींचे पैसे महामंडळाला नियमितपणे दिले जात आहेत, तसेच नवीन बसेस खरेदी करणे आणि बस स्थानकांच्या सुधारणेसाठी शासन सर्वतोपरी मदत करत आहे. मात्र, दैनंदिन डिझेलचा खर्च भागवणे आता कठीण होत चालले आहे.

या वाढत्या इंधन खर्चाला आणि प्रदूषणाला कायमस्वरूपी पर्याय म्हणून राज्य सरकारने २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने संपूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा मोठा निर्धार केला आहे. यासाठी राज्यात चार्जिंग स्टेशन्स उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. परंतु, भविष्यातील या योजनेआधी महामंडळाला सध्याच्या डिझेल संकटामधून बाहेर काढण्यासाठी पुढील महिन्यात भाडेवाढ लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

You may have missed