Mumbai Crime News | मुंबई : मीरा रोडवर सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला; एटीएसकडे तपास, धक्कादायक बाबी उघड

Mumbai Crime News | Mumbai: Knife attack on security guards on Mira Road; ATS investigating, shocking details revealed

मुंबई : Mumbai Crime News | मीरा रोड परिसरात सुरक्षा रक्षकांवर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने दोन सुरक्षा रक्षकांना ‘कलमा वाचता येतो का?’ असा प्रश्न विचारून त्यांच्या नकारानंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेत दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली आहे.

ही घटना रविवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मीरा रोड पूर्व, नया नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडली. सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन यांना आरोपीने नाव व धर्म विचारल्यानंतर कलमा वाचण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यावर आरोपीने त्यांच्यावर सपासप वार केले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दीड तासात आरोपी झैब झुबेर अन्सारी याला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीकडून एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये ‘LONE WOLVES WILL POUNCE ON YOU’ असा मजकूर तसेच जिहादसंदर्भातील उल्लेख आढळून आले. तसेच आरोपी इंटरनेटवर कट्टरतावादी व्हिडिओ पाहत असल्याची माहितीही समोर आली आहे.

आरोपी उच्चशिक्षित असून २०१९ पर्यंत अमेरिकेत शिक्षण घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो एका कोचिंग क्लासमध्ये गणित आणि रसायनशास्त्र शिकवत होता.

या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता की अचानक रागातून केला गेला, याचा तपास सुरू असून आरोपीचा मोबाईल, ब्राउझिंग हिस्ट्री आणि त्याचे संपर्क यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

You may have missed