Narhe Police News | पुणे : नऱ्हेत पोलिसांनीच लावला रुग्णालयाजवळ DJ; डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे CP अमितेश कुमार यांनी केलेल्या आवाहनालाच सुरुंग? (Video)
पुणे : Narhe Police News | सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे रुग्णालयाजवळ नऱ्हे पोलिस ठाण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीत मोठ्या आवाजात DJ वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर DJ ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा आणि शांतता राखावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे पोलिसांकडून आयोजित मिरवणुकीतच DJ चा वापर झाल्याच्या वृत्तामुळे नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नऱ्हे पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित गणेशोत्सव मिरवणुकीत मोठ्या आवाजात DJ वाजवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे नऱ्हे पोलिस ठाणे नवले हॉस्पिटलच्या परिसरातील इमारतीत असल्याने रुग्णालय परिसरातील ध्वनीमर्यादेचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे.
मिरवणुकीदरम्यान पोलिस कर्मचारी DJ च्या तालावर नृत्य करत असल्याचे व्हिडिओ आणि वृत्त समोर आल्यानंतर, रुग्णालयासारख्या संवेदनशील परिसरात निर्धारित ध्वनीमर्यादा आणि सायलेन्स झोनशी संबंधित नियमांचे पालन झाले का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मिरवणुकीला परवानगी होती का? डेसीबल मर्यादा पाळली का?
सामान्य गणेश मंडळांना मिरवणूक आणि साऊंड सिस्टीमसाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून डेसीबल मीटरद्वारे तपासणीही केली जाते.
त्यामुळे नऱ्हे पोलिसांच्या मिरवणुकीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का आणि DJ चा आवाज निर्धारित मर्यादेत होता का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
या प्रकाराची चौकशी झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून काही कारवाई केली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे.
नऱ्हे पोलिसांचा दावा – सर्व नियमांचे पालन
दरम्यान, नऱ्हे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी मिरवणूक प्रशासकीय परवानगी घेऊन आणि सर्व सरकारी नियमांचे पालन करून पार पडल्याचे स्पष्ट केले आहे.
“नऱ्हे पोलिस ठाण्याच्या श्रींची मिरवणूक प्रशासकीय परवानगी घेऊन व सर्व शासकीय नियमांचे पालन करत पार पडली आहे. ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्यात आले असून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती.”
– वर्षा देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नऱ्हे पोलिस ठाणे
