Pune Crime News | घर खाली करण्यास विरोध करणार्या तरुण, त्याच्या वडिलांना दगडाने मारहाण ! जीवे ठार मारण्याची दिली धमकी, स्विफ्ट कार, क्रेटा आणि टँकरची केली तोडफोड
पुणे : Pune Crime News | वडिलोपार्जित राहते घर आमच्या जागेत असल्याचा दावा करुन घर खाली करण्यास विरोध करणार्या तरुणाला, त्याच्या वडिलांना दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांची स्विफ्ट कार, क्रेटा गाडी व टँकरवर दगडफेक करुन त्यांच्या काचा फोडून नुकसान करत जीवे ठार मारण्याचा धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत मयुर विठ्ठल पवार (वय ३०, रा. पवार वस्ती, मांजरी खुर्द) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संदेश सिताराम पवार Sandesh Sitaram Pawar (वय २६), कुणाल सिताराम पवार Kunal Sitaram Pawar (वय २४), शिवाजी किसन पवार Shivaji Kishan Pawar (वय ४२), सोमनाथ सुंदरभाऊ पवार Somnath Sundarbhau Pawar (वय ३६), दीपक हरिलाल पवार Deepak Hiralal Pawar (वय ३८), राहुल हरिलाल पवार Rahul Hiralal Pawar (वय ४१, सर्व रा. पवार वस्ती, मांजरी खुर्द) व त्यांचे ४ ते ५ साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मांजरी खुर्द येथील पवार वस्तीमध्ये २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुर पवार यांच्या वडिलांच्या नावे मांजरी खुर्द येथे गट नंबर ६२८ मध्ये ५ गुंठे जागा आहे. तेथे त्यांचे वडिलोपार्जित घर असून तेथे ते राहत आहेत. संदेश पवार, कुणाल पवार, शिवाजी पवार यांची देखील गट नंबर ६२९ मध्ये २० गुंठे मिळकत आहे. ५ ते ६ महिन्यांपूर्वी त्यांनी जागेची खाजगी मोजणी केली होती. तेव्हा त्यांनी तुमचे अर्ध घर आमच्या जागेमध्ये येत असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी सरकारी मोजणीसाठी अर्ज केला आहे. मोजणीमध्ये तुमच्या वाटेला जी जागा येईल, ती देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. २० सप्टेंबर रोजी दुपारी संदेश पवार याने फिर्यादी यांना फोन करुन तुझी मोजणी कधी येणार आहे, असे विचारले. तेव्हा त्यांनी त्यास मोजणी लवकर येणार आहे, असे सांगितले. त्यावर त्याने तुझी मोजणी कधीपण येऊ दे, मी आज तुझे घर पाडुन जागेचा ताबा घेणार आहे, असे बोलला.
त्यानंतर रात्री ९ वाजता संदेश पवार, कुणाल, पवार, शिवाजी पवार, सोमनाथ पवार, दीपक पवार व राहुल पवार हे ४ ते ५ जण कार व दुचाकीवरुन आले. त्यावेळी ते बरोबर जेसीबी घेऊन आले होते. संदेश व कुणाल फिर्यादीला म्हणाले की, तुझे घर माझ्या जागेत येत आहे. मी आज तुमचे घर पाडुन माझी जागा घेणार आहे. तुमच्या गाड्या काढून घ्या, असे म्हणाले. तेव्हा फिर्यादी यांनी काय असेल ते सकाळी बघु, असे म्हणाले. त्यावर संदेश पवार याने हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या पाठोपाठ इतरांनी शिवीगाळ करुन दगडफेक केली. त्यामध्ये फिर्यादी यांच्या हातास व बरगडीस मार लागला. त्यांचे वडील विठ्ठल पवार व पत्नी नम्रता पवार यांना देखील हाताने मारहाण केली. प्रतिक आव्हाळे, विशाल आव्हाळे हे त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांना देखील त्यांनी हाताने मारहाण केली. तसेच त्यांनी फिर्यादी यांची स्विफ्ट कार, क्रेटा गाडी आणि टँकर या गाड्यांवर दगडफेक करुन काचा फोडल्या. दरवाजा चेंबून नुकसान केले. यावेळी संदेश पवार याने साथीदारांना गाडीमधील कोयता काढ व त्या कोयत्याने यास जीवे ठार मारतो, अशी धमकी दिली. त्यानंतर ते सर्व जण तेथून निघून गेले. पोलीस हवालदार विठ्ठल घुले तपास करीत आहेत.
