Nashik Crime News | त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन घोटाळा ! मंदिराच्या विश्वस्ताने पुतण्याला हाताशी धरुन भाविकांकडून उकळले पैसे, पोलिसांनी विश्वस्ताला केली अटक, पुण्यातील भाविकाकडून उकळले पैसे
नाशिक : Nashik Crime News | महिलांवर अत्याचाराच्या घटनेपाठोपाठ तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन धर्मांतर करण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असतानाच आता त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्तच आपल्या पुतण्याच्या मार्फत व्हीआयपी दर्शन देण्याच्या नावाखाली भाविकांकडून हजारो रुपये उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक पोलिसांनी विश्वस्तासह दोघांना अटक केली आहे. एका दिवसात केवळ अर्ध्या तासात ४ भाविकांची ९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विश्वस्त पुरुषोत्तम मधुकर कडलग Purushottam Madhukar Kadlag (वय ४६, रा. कडलग गल्ली, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक) आणि गोटीराम मनाजी पेहरे Gotiram Manaji Pehre (वय ४१, रा. खडकवाडी, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्वस्ताचे पुतणे अभिषेक कडलग आणि ओम कडलग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आनंदा सुरेश मेहंदळे (वय ४६, रा. पारस सोसायटी, टकलेनगर, पंचवटी, ता. जि. नाशिक) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचे मित्र राकेश जगन्नाथ वाघ (रा. मखमलाबाद, पंचवटी) हे त्र्यंबकेश्वर येथे ११ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता २०० रुपये दराचे देणगी दर्शन पास घेऊन दर्शन रांगेत उभे होते. गोटीराम पेहरे हा त्यांच्याजवळ आला. मी तुम्हाला १० मिनिटात व्ही आय पी दर्शन करुन देतो, असे सांगून तुम्ही घेतलेले पास दर्शनाकरीता ४ – ५ तास लागतील, मी तुम्हाला ३ हजार रुपयांमध्ये व्ही आय पी दर्शन करुन देतो, असे सांगितले. विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्या मदतीने फिर्यादीस मंदिराचे आत प्रवेश देऊन दर्शन करुन मंदिराचे बाहेर येताच फिर्यादीकडून गोटीराम पेहरे याने ३ हजार रुपये फी घेतले.
त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे कोणतीही अधिकृत फी आकारण्याबाबत सुविधा नसताना कुठलीही रिसीट न देता फिर्यादीकडून देवस्थान दर्शनासाठी जास्तीचे ३ हजार रुपये घेऊन फसवणुक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावित यांनी गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी दोघांना अटक केली.
दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या तपासामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याची शक्यता आहे. एका दिवसामध्ये फक्त अर्ध्या तासात एकूण ४ भाविकांची ९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून त्यामुळे देवस्थानची बदनामी होत आहे.
काही एजंट यांनी लाईनमध्ये तासनतास थांबलेल्या भाविकांशी संपर्क करणे, जलद दर्शन करण्यासाठी रेट ठरविणे, हे एजंट विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचे पुतणे अभिषेक कडलग, ओम कडलग यांच्याशी संपर्क करुन भाविकांना त्यांचे सोबत नेत. त्यानंतर भाविकांचे दर्शन विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्या मार्फत दर्शन करुन देणे, दर्शनाची प्रती भाविक ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये त्यांच्या ऐपतीप्रमाणे घेऊन त्यांची फसवणुक करत. मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ घेणे अशी गुन्ह्याची कार्यपद्धती आहे.
एक भाविक दिनेश दीपक चालके (वय ४०, रा. विमाननगर) यांची अशाच प्रकारे ६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. गोटीराम पेहरे याने त्यांना जलद दर्शन घेण्यासाठी प्रती व्यक्ती ६ हजार रुपये घेतले. ओम कडलग याच्या मार्फत दर्शन करुन दिले. एन्ट्री गेट रजिस्टरमधील कुणाल दीक्षित या नावाने एंन्ट्री केली. हे नाव बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भाविकांना प्रवेश देताना एमएसएफ चे कर्मचारी आनंन पाटील यांच्याशी ओम कडलग याचे फोनवरुन विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्याशी बोलणे करुन दिले. त्यांच्या सांगण्यावरून भाविक दर्शन घडवून आणले. एन्ट्री रजिस्टरमध्ये पुुरुषोत्तम कडलग यांच्या कॉलवरुन सोडण्यात आले व गावकरी ओम कडलग गेटवर हजर, अशी नोंद आहे. या सर्व घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये चित्रित झाले आहे. भाविकांच्या फसवणुकीच्या कटाचा मुख्य सुत्रधार विश्वस्त पुरुषोत्तम कडलग हा आहे. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत, यांचा शोध घ्यायचा आहे.
या फसवणुकीमधून मिळणार्या रक्कमेमध्ये आरोपींच्या लाभाचे प्रमाण/ टक्केवारी किती आहे, याचा तपास करायचा बाकी आहे. हा प्रकार अतिशय निंदनिय स्वरुपाचा असून भाविकांच्या धार्मिक भावना यामध्ये मोठ्या प्रमाणात दुखावल्या जात आहे. तसेच जलद गतीने प्रवेश देण्यामुळे ते तासनतास लाईनमध्ये उभे राहुन दर्शन घेतात, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे, असे सहायक सरकारी वकील जागृती ठाकूर यांनी न्यायालयाकडे करुन पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
