Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल दरवाढीचे केंद्र सरकारकडून संकेत; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता
Petrol Diesel Price | देशात इंधनाचा तुटवडा असल्याच्या अफवा आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याच्या चर्चेदरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. देशात सध्या इंधनाची कोणतीही कमतरता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी आगामी काळात इंधन दरवाढ होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
१२ मे रोजी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पुरी म्हणाले की, भारताकडे सध्या ६० दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि एलएनजीचा साठा उपलब्ध आहे. तसेच ४५ दिवसांचा एलपीजी साठा असून, घरगुती गॅसचे उत्पादनही ५५ ते ५६ हजार टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे इंधन टंचाईची भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, इंधन दरवाढ आणि निवडणुका यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करताना पुरी यांनी भविष्यात दर वाढू शकतात, असे संकेत दिले. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सरकारी तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून सध्या इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र, यामुळे तेल कंपन्यांना दररोज जवळपास १००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. या तिमाहीत हा तोटा १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनचा उल्लेख करत पुरी म्हणाले की, जागतिक तणाव कायम राहिला तर अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
