Pune Crime News | कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाकडून 15 लाख रुपयाची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कोंढवा परिसरातील एका बांधकाम प्रकरणात खंडणी, दमदाटी आणि पुणे महानगरपालिकेकडे तक्रारी करून बांधकामावर कारवाई घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम नियमित करून देण्याच्या नावाखाली तसेच तक्रारी न करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे 25 लाख रुपये आणि एका सदनिकेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी शफी गुलजारखान पठाण Shafi GulzarKhan Pathan (६६), समीर शफी पठाण Sameer Shafi Pathan (३५. दोघे रा. पारगेनगर, कोंढवा पुणे), कमल नितिन खैरनार Kamal Nitin Khairnar (६२ रा. धर्मावत पेट्रोल पंपाचे मागे, पिसोळी) आणि साजिद हसन शेख Sajid Hasan Shaikh (४० रा. पोकळे मळा, पारगेनगर पुणे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 36 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी 2024 मध्ये मौजे कोंढवा खुर्द येथे जागा आणि जुनी इमारत सुमारे 60 लाख रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू केले. बांधकाम सुरू झाल्यानंतर आरोपी शफी पठाण यांनी “मला विचारल्याशिवाय या भागात कोणी बांधकाम करत नाही,” असे म्हणत फिर्यादीला दमदाटी केल्याचा आरोप आहे.
तसेच पुणे महानगरपालिकेकडे तक्रार करून बांधकामावर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसांनी महापालिकेकडून बांधकामावर कारवाई करून मोडतोड करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यानंतर आरोपींनी बांधकाम नियमित करून देण्यासाठी तसेच पुढील तक्रारी टाळण्यासाठी 25 लाख रुपये आणि एक 2 बीएचके फ्लॅट देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. बांधकाम बंद पाडण्याच्या भीतीने फिर्यादीने वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण 15 लाख रुपये रोख आणि बँक व्यवहाराद्वारे दिल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
