Pimpri Chinchwad Police | शस्त्राचा गैरवापर करणार्‍या 5 जणांसह 15 जणांचे शस्त्र परवाने रद्द; पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी 68 जणांना नाकारले शस्त्र परवाने

pimpri-chinchwad-police

पुणे / पिंपरी : Pimpri Chinchwad Police | शस्त्र परवाना दिला असताना त्याचा दुरुपयोग केल्याने व इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ५ जणांबरोबर इतर १५ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. त्याचबरोबर नवीन शस्त्र परवाना मागणार्‍या ६८ जणांना परवाना नाकारले आहेत.

शस्त्र परवानाधारक मयुर काळुराम भोईर (वय ३०, रा. हिंजवडी), सुभाष भिकाजी सपकाळ (वय ७०, रा. नवी सांगवी), विजय नामदेव लांडे (वय ४८, रा. भोसरी) साहिल राजेंद्र ढमाले (वय ३२, रा. देहुगाव), शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय ४१, रा. आंबेठाण) यांच्याविरुद्ध शस्त्राचा दुरुपयोग केल्याने व इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशीत परवानाधारक यांची कसुरी आढळल्याने त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले. शस्त्र परवाना मंजुर केलेल्या व्यक्ती, ज्यांनी दिलेल्या मुदतीत शस्त्र खरेदी केले नाहीत, अशा २ शस्त्र परवानाधारक, तसेच ज्या शस्त्र परवानाधारकांना वृद्धत्व आले किंवा मरण पावले, असे एकूण ८ परवानाधारक असे एकूण १५ शस्त्र परवाना धारक यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

नवीन शस्त्र परवाना प्राप्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे प्राप्त अर्जांपैकी ६९ व्यक्तींना शसत्र परवाने नाकारले आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये या व्यक्तींना शस्त्र परवाने मंजूर करण्यासाठी कोणतेही सबळ कारण अथवा आधार नसल्याचे आढळून आल्याने त्यांना शस्त्र परवाने नाकारण्यात आलेले आहेत.

अनेक गुंड बेकायदेशीरपणे शस्त्र परवाने घेत असल्याचे आढळून आले. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आरोपींनी शस्त्र परवाना मिळविला होता. त्या शस्त्राचा त्याने धाक दाखवुन तिच्या मुलाला आपल्या ताब्यात ठेवले होते. तसेच पुण्यातही काही गुंडांनी बनावट पत्ते देऊन शस्त्र परवाने मिळविले होते. त्यानंतर शस्त्र परवाने देण्याचे धोरण अधिक कडक करण्यात आले आहे.

You may have missed