Pune ACB Trap Case | जमिनीच्या 7/12 वर वारसा नोंद 6 महिने प्रलंबित ठेवून लाच घेणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला अटक

Pune ACB Trap Case

पुणे : Pune ACB Trap Case | जमिनीच्या ७/१२ वर वारसा नोंद करण्याचा अर्ज सहा महिने प्रलंबित ठेवून नोंदीसाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागून ७० हजार रुपये लाच हस्तकाकरवी घेताना ग्राम महसूल अधिकार्‍याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. (Pune Bribe Case)

ग्राम महसूल अधिकारी सुनील भिकाजी सातोसे Sunil Bhikaji Satose (वय ४४, रा. आय ट्रेंड लाइफ, वाकड) आणि खासगी व्यक्ती नेमाजी माधवराव भोकरे Nemaji Madhavrao Bhokare (वय ४०, रा. काकडे सिटी, चर्‍होली खुर्द रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या आजोबांची चर्‍होली बुद्रुक येथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर या शेतजमिनीवर तक्रारदार यांचे वडिल व काका यांची वारसनोंद लावण्यासाठी तक्रारदार यांनी डिसेंबर २०२५ मध्ये चर्‍होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालय येथील अधिकारी तलाठी सुनील सातोसे यांना अर्ज दिला होता. तक्रारदार यांनी वारंवार चौकशी करुन देखील सुनील सातोसे यांनी वारस नोंद केली नाही. २९ मे रोजी तक्रारदार यांनी वारस नोंदणीबाबत परत एकदा चौकशी करण्याकरीता चर्‍होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालय येथे गेले होते. त्यावेळी सुनील सातोसे याने तक्रारदार यांना वारस नोंदीसाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोड करुन ८० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबतची तक्रार १ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ४ जून रोजी पडताळणी केली. त्यात सुनील सातोसे याने ८० हजारांची मागणी करुन तडजोडीअंती ७० हजार रुपये लाच मागून ती खासगी व्यक्ती नेमाजी भोकरे याच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे ८ जून रोजी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चर्‍होली बुद्रुक येथील ग्राम महसूल कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ७० हजार रुपये घेताना नेमाजी भोकरे याला पकडण्यात आले. पाठोपाठ ग्राम महसूल अधिकारी सुनील सातोसे याला ताब्यात घेण्यात आले. दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांचे सहकारी यांनी ही कारवाई केली. सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ अधिक तपास करीत आहेत.

You may have missed