Pune Crime News | डहाणुकर कॉलनी, सिटी प्राईड कोथरुडमधील 49 गुंठे जागा नावावर करुन देण्याचे आमिष दाखवुन बांधकाम व्यावसायिकाची 10 कोटींची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कोथरुड येथील सिटी प्राईड मल्टीफ्लेक्सजवळील ३२ गुंठे आणि डहाणुकर कॉलनीतील १७ गुंठे जागा नावावर करुन देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची १० कोटी १० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत संतोष शांताराम धनकवडे (वय ४४, रा. साईकुंज, गुलाबनगर, धनकवडी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वैष्णवी रामकुमार कट्टा Vaishnavi Ramkumar Katta (रा. आशिर्वाद कॉलनी, अमरावती), डॉ. सुजाता किशोर ठाकरे Dr. Sujata Kishor Thackeray (रा. सिडको संभाजीनगर) आणि रवि ऊर्फ रंजन बाबरे (रा. महेश गॅलक्सी, सिंहगड रोड, हिंगणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुडमधील हडाणुकर कॉलनीत नोव्हेंबर २०२३ ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष धनकवडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. कोथरुडमधील सिटी प्राईड थिएटरजवळ ३२ गुंठे जागा आणि हडाणुकर कॉलनीमधील १७ गुंठे जागा मोकळ्या आहेत.
या दोन्ही जागा वादग्रस्त असून त्यात लिटीगेशन आहे. न्यायालयात वाद सुरु आहे. रवी बाबरे याने जागामालक वैष्णवी कट्टा व डॉ. सुजाता ठाकरे यांना पैसे दिल्यास ते या जागा नावावर करुन देतील, असे सांगितले. रवी बाबरे यांच्या सांगण्यावरुन संतोष धनकवडे यांनी जागांच्या व्यवहारासाठी वैष्णवी कट्टा आणि डॉ. सुजाता ठाकरे यांना १० कोटी १० लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतरही त्यांनी दोन्ही जागा फिर्यादींच्या नावावर करुन दिल्या नाहीत. तसेच पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ करुन पैसे दिले नाहीत. त्यामुळे शेवटी संतोष धनकवडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी केल्यानंतर अलंकार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमृता पाटील तपास करीत आहेत.
