Pune Accident News | खडकवासल्यात ‘हिट अँड रन’ केस; कारच्या धडकेत चार वर्षाच्या मुलाचा मृत्यु, मद्यपी कारचालकाला अटक
पुणे : Pune Accident News | मद्यपी कारचालकाने एका पाठोपाठ एका गाड्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. अपघातात दुचाकीस्वार व त्याची पत्नी जखमी झाली. नागरिकांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मद्यपी कारचालकाला पकडून चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे.
यशराज नीलेश कांबळे (वय ४, रा़ धायरी) असे अपघातात मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे़ अपघातात नीलेश कांबळे (वय ३६) आणि त्यांची पत्नी जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी मद्यपी कारचालक अमोल गोरक्षनाथ गेगडे Amol Gorakshnath Gegde (वय ३६, रा. अहिल्यानगर) याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश कांबळे हे भाजीपाला विक्रेते आहेत. खडकवासला भागात ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी १६ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नीलेश कांबळे, त्यांचा मुलगा यशराज आणि पत्नी हे खडकवासल्याहून पुण्याकडे निघाले होते. खडकवासला भाजी मंडई परिसरात भरधाव कारने कांबळे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी, तसेच चारचाकी वाहनाला कारने धडक दिली.
अपघात झाल्यानंतरही कार न थांबवता चालक अमोल गेगडे हा पळून जात होता़ अपघातानंतर खडकवासला भाजी मंडई परिसरात नागरिकांची गर्दी झाली. नागरिकांनी पाठलाग करून कारचालक अमोल याला पकडले. नागरिकांनी त्याला चोप दिला. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. गंभीर जखमी झालेल्या यशराजसह त्याच्या आई-वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान यशराजचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी मोटारचालक अमोल याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे़ पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे तपास करत आहेत.
