Pune Crime News | 93 लाखांच्या फसवणूक प्रकरणातील दोन फरार आरोपी पुण्यात जेरबंद

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | ठाणे शहरातील ९३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या दोन संशयितांना पुणे वाहतूक पोलिसांनी आप्पा बळवंत चौक परिसरातून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी दोघांना ठाण्यातील कोपरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अक्षय संजय तांबे Akshay Sanjay Tambe (वय २२) आणि ओंकार विष्णू शिरसाठ  Omkar Vishnu Shirsath (वय २४, दोघे रा. ठाणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे आणि शिरसाठ यांच्याविरुद्ध ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका व्यक्तीची ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार होते.

कोपरी पोलिसांकडून प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू असताना संशयित आप्पा बळवंत चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. याबाबत पुणे वाहतूक पोलिसांच्या विश्रामबाग विभागातील सहायक पोलिस निरीक्षक म्हात्रे यांना कळविण्यात आले.

पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक म्हात्रे, पोलिस हवालदार खरात, गौड तसेच पोलिस कर्मचारी शेख, कानवडे आणि प्रधान यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोघेही ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणात फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तांबे आणि शिरसाठ यांना पुढील तपासासाठी कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक शाखेने दिली.

You may have missed