Pune Court News | पुणे : जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता; भोंदू ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला
पुणे : Pune Court News | देवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी भोंदू ऋषिकेश वैद्य याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी गुन्ह्याचे गांभीर्य, प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती विचारात घेऊन हा निर्णय दिला.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या वैद्यने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सरकारी वकील ॲड. लीना पाठक आणि फिर्यादीच्या वतीने ॲड. रोहन नहार यांनी विरोध केला. ॲड. नहार यांना ॲड. ओंकार फडतरे, ॲड. गायत्री पोटवडे आणि ॲड. चैतन्य अभंग यांनी सहकार्य केले.
सरकार पक्ष आणि फिर्यादीच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले की, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीने धार्मिक गुरू म्हणून निर्माण केलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. अशा परिस्थितीत आरोपीला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी जामीन मिळण्यासाठी आवश्यक असलेला प्रथमदर्शनी आधार सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले. त्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र नसल्याचे सांगत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.
ही घटना डिसेंबर २०२३ ते ११ मे २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी २७ मार्च २०२६ रोजी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी २८ मार्च रोजी ऋषिकेश वैद्यला अटक केली. सुरुवातीला तो पोलिस कोठडीत होता, तर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
फिर्यादीनुसार, पीडित महिलेची आरोपीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीने आपण देवाचा भक्त असल्याचे सांगत तिला उपासना कशी करायची, हे शिकवण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेत असतानाच पुण्यातील हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.
