Pune Crime Court News | पुणे : लोहेगावमधील जमीन वादाप्रकरणी विमाननगर पोलिसांना रुणवाल एंटरप्रायझेसच्या संचालकांविरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश; विमाननगर पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे
पुणे : Pune Crime Court News | दोन नामांकित विकासकांमधील बहुचर्चित वादात मोठी घडामोड घडली असून पुणे येथील प्रथमवर्ग न्यायालयाने विमाननगर पोलिसांना रुणवाल एंटरप्रायझेसचे संचालक सुबोध सुभाष रुणवाल, आशुतोष एन. नवरे, ल्युसी रॉय चौधरी, एम.बी. अग्रवाल अँड कंपनी (चार्टर्ड अकाउंटंट्स) तसेच अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १११, ३१८, ३२९, ३३३, ३३६, ३३८ आणि ३४१ अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांबाबत प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणात न्यायालयाने विमाननगर पोलिसांच्या निष्क्रियतेवरही कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने मागवूनही पोलिसांकडून अहवाल किंवा म्हणणे सादर करण्यात आले नसल्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने पोलिस तपासाची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी संबंधितांकडून दखलपात्र गुन्हा घडल्याची शक्यता व्यक्त करत भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १११, ३१८(२), ३२९(३), ३३६(३), ३३८, ३४१ आणि ६१(२) अंतर्गत FIR नोंदवून तपासाचे आदेश दिले.
तक्रारदार रणजीत दरक यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, आरडीपीएलने २० वर्षांत एकही इमारत पूर्ण केली नाही आणि संयुक्त विकास करारातील अटी पूर्ण न करताच विकास हक्क बेकायदेशीररित्या रुणवाल एंटरप्रायझेसला हस्तांतरित केले. यासाठी आवश्यक परवानगीही घेण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच, सतीश मित्तल यांच्या निधनानंतर कायदेशीर वारसांचा समावेश न करता कर विवरणपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, प्रकल्प, जमीन आणि संबंधित कागदपत्रे पुण्यातील असताना चुकीची माहिती देत मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात FIR दाखल केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणामुळे बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात नेमके कोणते नवे खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
