Pune Crime News | 100 हून अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून अंलकार पोलिसांनी 12 लाखांचा माल केला जप्त, कारच्या काचा फोडून चोरीचे 2 गुन्हे उघडकीस, दोन महिन्यांपूर्वी आला होता तुरुंगातून बाहेर

Pune Crime News | Analkar police arrested a notorious criminal with more than 100 crimes and seized goods worth Rs 12 lakhs, 2 cases of theft by breaking car windows revealed, he had come out of jail two months ago

पुणे : Pune Crime News |  दोन महिन्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेला व पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, अहिल्यानगरमधील विविध ठिकाणी १०० हून अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराला अलंकार पोलिसांनी पकडून कारच्या काचा फोडून चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून ९७ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम व दुचाकी असा १२ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

राजू बाबुराव जावळकर Raju Baburao Jawalkar (वय ५७, रा. डोणजे फाटा, ता. हवेली) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. डेक्कन परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्यातून तो २ महिन्यांपूर्वी सुटून तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने अलंकार पोलीस ठाण्याच्या परिसरातील ६ कारच्या काचा फोडून त्यातील ऐवज चोरुन नेला होता.

राजू जावळकर हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी तो ट्रक, डंपर चोरुन नेत असे़ त्याचे स्पेअर पार्ट काढून ट्रक भंगारात विकत असे़ त्यातून त्याला अनेक वेळा वेगवेगळ्या पोलिसांनी पकडले होते़ जामीनावर सुटल्यानंतर तो पुन्हा चोर्‍या करत असे.

कोथरुड, कर्वेनगर भागात रोडच्या कडेला पार्क केलल्या कारच्या काचा फोडून त्यातील वस्तू, ऐवज चोरुन नेण्यात आला होता. अनेक गुन्हे एकाच परिसरात झाल्याने पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी गुन्ह्याचा छडा लावण्याचा आदेश दिला होता. तपास पथकाने ज्या ठिकाणी चोर्‍या झाल्या होत्या. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषणातून राजू जावळकर याचे नाव समोर आले. तपास पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला डोणजे येथून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्यात प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखविले़ ते पाहून त्याने गुन्हा कबुल केला.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक स्मीता पाटील यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, माधुरी कुंभार, राकेश क्षीरसागर, शिवाजी शिंदे, आशिष राठोड व विशाल मोरे यांनी केली आहे.

You may have missed