Pune Police Nakabandi | पुण्यात एन्ट्री करताना सावधान! शहरातील सात प्रमुख मार्गांवर पोलिसांची विशेष नाकाबंदी

Pune Police Nakabandi | Be careful while entering Pune! Special police blockade on seven major roads in the city

Pune Police Nakabandi | पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे पोलिसांनी शहराच्या प्रमुख प्रवेश मार्गांवर विशेष वाहन तपासणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांवर अधिक बारीक लक्ष ठेवण्यासाठी आठवडाभर वेगवेगळ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येणार आहे.

या विशेष मोहिमेत शहरातील सात महत्त्वाच्या प्रवेश मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सातारा रस्ता, बाणेर रस्ता, सोलापूर रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग, नगर रस्ता, सिंहगड रस्ता आणि सासवड रस्ता या मार्गांवर पोलिस तपासणी नाके उभारले जाणार आहेत. दररोज रात्री ठराविक वेळेत वाहनांची तपासणी करून संशयित वाहनांवर आणि व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

या मोहिमेत वाहतूक शाखा, स्थानिक पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. संशयास्पद वाहनांची निवडक तपासणी, कागदपत्रांची पडताळणी आणि गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

नाकाबंदीच्या ठिकाणी आवश्यक शस्त्रसज्जतेसह पोलिस कर्मचारी तैनात असणार असून, वाहनचालकांना अनावश्यक त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष असणार असून, दररोजचा अहवाल पोलिस उपायुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

You may have missed