Pune Crime Court News | आर्थिक फसवणुकीचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा; जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोट्यावधीची फसवणूक करणार्‍याचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Pune Crime Court News | The crime of financial fraud is very serious; The court rejected the bail of the person who cheated crores by committing a heinous act like witchcraft

पुणे : Pune Crime Court News | आर्थिक फसवणूकीचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामुळे गुंतवणुकदाराच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो, सर्वोच्च न्यायालयाने असे प्रतिपादन केले आहे की, फसवणुकीचा गुन्हा हा खुनाच्या गुन्ह्याइतकाच गंभीर आहे, अशी टिपणी करत जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोट्यावधींची फसवणूक करणार्‍याचा जामीन न्यायालयाने फेटाळला.

माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांनी हा निर्णय दिला आहे.

याबाबत बासित अब्दुल लतिफ शेख यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माजीद उस्मान आत्तार याच्यासह ५ जणांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायात पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देऊ असे आमिष दाखवून बासित शेख  यांची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रमाणेच आणखी तिघांची मिळून एकूण ६ कोटी २३ लाखांची फसवणूक केली आहे.  गेली २ वर्षे माजीद आत्तार न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांच्या न्यायालयात झाली.

समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी या खटल्यातील अतिरिक्त चार्जशिट व इतर पुरावे दाखल केले आहेत.
बासित शेख यांच्या वतीने अ‍ॅड. अमेय सिरसीकर यांनी युक्तिवाद केला की, माजीद आत्तार हा गुन्ह्यातून फसवणूक करुन मिळवलेल्या पैशांचा लाभार्थी आहे. आरोपी माजीद याने ज्या भूखंडावर गुन्ह्यातून फसवणूक करून मिळालेले पैसे वापरून इमारत बांधलेली आह. त्या भूखंडाचा तो मालक आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी त्या भूखंडावर इमारत बांधून त्या इमारती मधील  सदनिका वेगवेगळ्या लोकांना विकून त्यातून जे पैसे मिळाले आहेत त्या पैशाचा अपहार करून ते पैसे स्वत:साठी वापरले आहेत. याआरोपीचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा सबळ पुरावा अ‍ॅड. अमेय सिरसीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

न्यायालयाने निकालपत्रात सांगितले की, आरोपी हा लाभार्थी आहे. मौलाना शोएब आत्तार याच्या सांगण्यावरुन फिर्यादी व इतरांनी रक्कम गुंतविली आहे. या आरोपीसह इतर आरोपींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे. आरोपी रोया ऊर्फ सीमा नादीर नईमा आबादी हिला केवळ ती एक महिला आहे आणि तिचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तसेच सी ए भंडारी हे हे केवळ हिशोब सांभाळण्याचे काम करत असत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दोषारोपा वरून असे स्पष्ट होते की, तो संपूर्ण व्यवहारात लाभार्थी होता. गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यामुळे समानतेचा नियम लागू होत नाही, असे सांगून न्यायालयाने माजीद आत्तार याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सरकारी वकील सप्रे, गुंतवणुकदारांच्या वतीने अ‍ॅड अमेय सिरसीकर यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. रितीका गंगवाणी, अ‍ॅड. प्रतिक वारे यांनी सहाय्य केले.

You may have missed