Pune Crime News | पुणे : सकाळी फिरायला गेलेल्या 73 वर्षीय महिलेचा नदीपात्रात मृतदेह; सोशल मीडियाच्या मदतीने काही तासांत ओळख पटली

Pune Crime News | Pune: 73-year-old woman who went for a morning walk found dead in a riverbed; identified within a few hours with the help of social media

पुणे : Pune Crime News |  सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृतदेह येरवडा येथील आगखाना ब्रिज परिसरातील नदीपात्रात आढळून आला. ओळखपत्र नसतानाही येरवडा पोलिसांनी सोशल मीडियाच्या मदतीने अवघ्या काही तासांत महिलेची ओळख पटवून नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचवली.

शनिवार (२ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्याच्या रामवाडी मार्शल पथकाला वनिता वस्ती, आगखाना ब्रिज परिसरातील नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने महिलेला नदीतून बाहेर काढून तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

मृत महिलेकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने तिची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. महिलेच्या अंगावरील कपडे आणि दागिन्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडियाचा वापर करून रात्री उशिरा संबंधित महिलेची ओळख शोभा कैलाश शहा (वय ७३, रा. पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, शिवाजीनगर) अशी पटली.

खडकी पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची नोंद

पुढील तपासात खडकी पोलीस ठाण्यात २ ऑगस्ट रोजी शोभा शहा बेपत्ता झाल्याची नोंद असल्याचे समोर आले. येरवडा पोलिसांनी तत्काळ खडकी पोलिसांशी संपर्क साधून नातेवाईकांची माहिती मिळवली. सर्व शहानिशा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांचे पुत्र सुमित शहा यांच्या ताब्यात देण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, शोभा शहा या शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नव्हत्या. दरम्यान, येरवडा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीत त्यांची ओळख पटवून नातेवाईकांपर्यंत माहिती पोहोचवली. या तत्पर कारवाईबद्दल शहा कुटुंबीयांनी येरवडा पोलीस आणि पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस करत असून, शवविच्छेदन अहवालानंतर महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

You may have missed