Pune Crime News | पुणे : दारुच्या नशेत  पोलीस व्हॅन चालविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने चार वाहनांना दिली धडक; पोलीस हवालदाराला अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | टिळक रोडवर सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली असताना दारुच्या नशेत पोलीस हवालदाराने पोलीस व्हॅन देशमुखवाडीतील गल्लीत घालून २ कार, पॅगो टेम्पो, एक दुचाकी अशा चार गाड्यांना धडक देऊन मोठे नुकसान केले. सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने कोणी जखमी झाले नाही. हा अपघात टिळक रोडला लागून असलेल्या देशमुखवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडला. विश्रामबाग पोलिसांनी या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

बाळासाहेब वसंत खैरे Balasaheb Vasant Khaire (वय ५२) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. खैरे हा मोटार वाहन विभागात नेमणूकीस आहे.

याबाबत अभिषेक गोविंद लिमये (वय ३८, रा. गुरुप्रसाद वाडा, देशमुखवाडी, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शनिवारी पुणे दौरा होता. त्या अनुषंगाने टिळक रोडवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी टिळक रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस हवालदार बाळासाहेब खैरे हा पोलीस व्हॅन घेऊन टिळक रोडने जात होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्याने मोठी पोलीस व्हॅन देशमुखवाडी येथील गल्लीत घातली. गल्लीत रोडच्या कडेला कार, टेम्पो पार्क केले होते. खैरे याने एका कारला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे ही कार पुढील कारला व टेम्पोला जाऊन जोरात धडकली. धडक दिल्यामुळे ही कार तिरकी होऊन आणखी रोडच्या मध्ये आली. तिला परत धडक देऊन तो वेगाने पोलीस व्हॅन घेऊन भिकारदास मारुती रोडकडे चालला होता. तेव्हा चैतन्य साठे व विश्वनाथ लिमये यांनी पोलीस व्हॅन थांबवून त्यातील चालक बाळासाहेब खैरे याला पकडले. अपघाताचे वृत्त समजताच विश्रामबाग पोलीस तातडीने तेथे आले.

अपघातात अभिषेक गोविंद लिमये यांची हुंडाई कार, कुंदन कुमार साठे यांची मारुती सुझुकी वॅगनआर, अद्वैत राजस खळदकर यांची दुचाकी ज्युपिटर, विश्वनाथ लक्ष्मण लिमये यांचा तीन चाकी पॅगो टेम्पो यांचे मोठे नुकसान झाले.

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले की, वाहतूक कोंडीमुळे त्याने गल्लीत पोलीस व्हॅन घातली व कडेला पार्क केलेल्या वाहनांना धडक दिली. वाहनचालकाची मेडिकल केली असून त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी त्याच्यावर मोटारवाहन अधिनियम १९८८च्या १८४, १८५, भा़ न्याय संहिता २८१, ३२४ (४), ३२४(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

You may have missed