Pune Crime News | 40 टन ऊसाची तोड करुन गुर्हाळाला घातला ! चोरट्यासह लोणीकंद पोलिसांनी गुर्हाळचालकाला केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | आईची तब्येत बिघडल्याने तिला पाहण्यासाठी पुण्यात आले असताना तिकडे चोरट्याने शेतातील ४० टन ऊस तोडून तो गुर्हाळाला घातल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणीकंद पोलिसांनी चोरट्यासह गुर्हाळचालकाला अटक केली आहे.
नवनाथ लक्ष्मण कोतवाल Navnath Laxman Kotwal (वय २९, रा. आष्टापूर,पठारवाडी, ता़ हवेली), योगेश पोपट गव्हाणे Yogesh Popat Gavhane (वय २५, रा. आष्टापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अनिल नंदकुमार कामठे (वय ४४, रा. खराडकर चाळ, मुंढवा) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अनिल कामठे व त्यांचे दोन भाऊ यांची आष्टापूर येथे वडिलोपार्जित अडीच एकर शेतजमीन आहे. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर ऊस लागवड केलेली आहे. १९ ऑगस्ट रोजी त्यांची आई आजारी असल्याचे समजल्याने ते व त्यांचे दोन भाऊ मुंढवा येथे आले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी त्यांचा भाऊ संजय कामठे हा मुंढव्याहून आष्टापूर येथे शेतावर गेला. त्यावेळी त्यांच्या शेतातील ऊस कोणीतरी तोडून नेल्याचे दिसले. शेतातील दीड एकर ऊसापैकी फक्त पाच ते सहा गुंठे ऊस तेथे उभा होता. उर्वरित ५५ गुंठे क्षेत्रामधील ८८ हजार रुपयांचा ७ महिने वयाचा अंदाजे ४० टन ऊस कोणीतरी तोडून चोरुन नेला होता.
लोणीकंद पोलिसांनी केलेल्या तपासात नवनाथ कोतवाल याच्या सांगण्यावरुन योगेश गव्हाणे याने त्याचे कामगारांच्या मदतीने ऊस तोडून चोरुन नेला. हा ऊस त्यांनी गुर्हाळामध्ये घातल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कागणे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, सागर जगताप, मल्हारी सुपरे, सुधीर शिवले, दिनेश मरकड, सागर वाळके, अजिंक्य ढमढेरे, सचिन चव्हाण, सुनिल काळे यांनी केली आहे.
