Pune Crime News | शहरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक ! पैसे न दिल्याने टोळक्याने लोखंडी रॉड तरुणाच्या डोक्यात मारुन केले गंभीर जखमी, जखमी अवस्थेत आठवत नसल्याने तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल

Crime

पुणे : Pune Crime News | शहरातील वाढत्या गुन्हेगारीची चर्चा सुरु असतानाच केवळ गुन्हेगारांना पैसे न दिल्याने एका सर्वसामान्य तरुणाला प्राणावर बेतले होते. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्यांचा जीव वाचला. टोळक्याने रस्त्यात  थांबवुन तरुणाकडे पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जबर जखमी करुन त्यांचा मोबाईल चोरुन नेला. जबर जखमी झाल्याने त्यांना आठवत नसल्याने व डॉक्टरांनी बोलू देण्यास नकार दिल्याने तब्बल तीन दिवसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत महानतेश दानप्पा डोमनाळ (वय ३८, रा. अनिता रेसिडेन्सी, महाबळेश्वर हॉटेल शेजारी, कात्रज कोंढवा रोड, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तीन चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज कोंढवा रोडवरील माऊलीनगर बसस्टॉपजवळ २४ मे रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  महानतेश डोमनाळ हे भारती हॉस्पिटलमध्ये आय सी यु मध्ये उपचार घेत आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली आहे. डोमनाळ हे २४ मे रोजी रात्री साडे आठ वाजता दूध आणण्यासाठी घराजवळील कात्रज कोंढवा रोडवरील कपिल अमृत डेअरी येथे पायी जात होते. यावेळी तिघे जण त्यांच्याजवळ आले व पैसे मागू लागले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांच्यातील एका मुलाने लोखंडी पाईप सारख्या वस्तूने त्यांच्या डोक्यात जोरात मारले. त्यामुळे ते खाली पडले. या चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन ते पळून गेले. डोमनाळ यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. त्यांनी तेथून जाणार्‍या एका व्यक्तीकडून मोबाईल घेऊन पत्नीला फोन केला. त्यांची पत्नी रोहिणी व ओळखीचे मंजरी पांढरकर यांनी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना उलट्याही झाल्या होत्या. त्यात नेमके काय झाले, हे त्यांना आठवत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अधिक बोलू देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांची फिर्याद घेता आली नव्हती. नेमका काय प्रकार घडला हे पोलिसांना तेव्हा समजू शकले नाही. डोमनाळ यांनी तीन दिवसांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.

You may have missed