Pune Crime News | खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात 2 महिन्यांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | दत्तवाडी, मार्केटयार्ड परिसरात दहशत माजविणार्या, मोक्का सारखे गुन्हे असलेल्या व मार्केटयार्ड येथील खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात गेल्या २ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
सिद्धार्थ विजय गायकवाड ऊर्फ चॉकलेट Siddharth Vijay Gaikwad Alias Chocolate (वय २४, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) असे या गुंडाचे नाव आहे. सिद्धार्थ गायकवाड टोळीवर यापूर्वी १४ गुन्हे नोंदविण्यात आले होते. गायकवाड याच्यासह १७ जणांवर ३ वर्षांपूर्वी पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
२ महिन्यांपूर्वी मार्केटयार्ड परिसरात तरुणावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सिद्धार्थ गायकवाड फरार होता.
गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शंकर कुंभार, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे व सद्दाम तांबोळी यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली की, सिद्धार्थ गायकवाड हा भूगाव परिसरात फिरत आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी भूगावला जाऊन सिद्धार्थ गायकवाड याचा शोध घेतला. तेव्हा तो एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, सद्दाम तांबोळी, ओमकार कुंभार, अजीम शेख, शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, संतोष टकले, विनायक वगारे यांनी केली आहे.
