Pune Crime News | त्रास देणार्या गुंडाचा मित्रांनीच पालघनने वार करुन केला निर्घुण खुन; गुंडाने ठेवायला दिलेली हत्यारे त्याच्यावरच चालविली, तडीपार गुंडासह तिघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात (Video)
पुणे : Pune Crime News | दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा त्याच्याच मित्रांनी पालघनने वार करुन निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका तडीपार गुंडासह ३ गुंडांना पकडले आहे.
राणा कांबळे (वय २६, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे खुन झालेल्या गुंडाचे नाव आहे. राणा कांबळे याने स्वत: बनवून घेतलेली हत्यारे आपल्या मित्राकडे ठेवायला दिली होती. त्याच हत्यारांनी या गुंडांनी त्याच्यावर वार करुन खुन केल्याचे उघड झाले आहे. ही घटना गंगानगरमध्ये मंगळवारी रात्री १० वाजता घडली. पोलिसांनी ओमकार मोरे, आदित्य पिंपळेकर, आदित्य कांबळे, दत्ता गिते, अरुण यादव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अरुण यादव हा सध्या तडीपार होता, त्याच्यासह ओमकार मोरे आणि अदित्य पिंपळेकर यांना गुन्हे शाखेने रात्रीतून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारही केले होते. तडीपारी संपल्यानंतर तो नुकताच पुन्हा पुण्यात आला होता. तो आरोपींना घेऊन फिरत होता. त्याच्याबरोबर असलेल्यांना त्रास देत होता. राणा याने पालघन सारखी हत्यारे स्वत: बनवुन घेतली होती. ती त्याने ओमकार मोरे याच्याकडे ठेवायला दिली होती. दोन दिवसांपूर्वी त्याची व ओमकार मोरे याची भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात ओमकार मोरे याने राणाने दिलेल्या पालघनने त्याच्यावर सपासप वार करुन त्याचा खुन केला. फुरसुंगी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
