Pune Police News | पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पिस्तुलधाऱ्यांना दणका; एकाच दिवसात 40 शस्त्र परवाने केले रद्द
पुणे : Pune Police News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्र परवान्यांची अतिशय कडकपणे पडताळणी सुरु केली असून मंगळवारी एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द केले आहेत. शस्त्र परवान्याचे नुतनीकरण न करणे, शस्त्राची प्रत्यक्ष गरज नसल्याचे निष्पन्न होणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीसह इतर विविध कारणांमुळे हे शस्त्र परवाने रद्द केले आहेत.
अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकूण २८९ शस्त्र परवाने रद्द, तर ४७६ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
रद्द करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये २०२०, २०२१ आणि २०२२ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या परवान्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मागील काही वर्षांत स्वसंरक्षणासाठी परवाना हवा, असे कारण देत अनेकांनी पिस्तुल परवाने मिळविले होते. त्यावरुन काही महिन्यांपूर्वी मोठा गदारोळ उठला होता.
ज्यांनी यापूर्वी शस्त्र परवाने मिळविले, त्यांच्या शस्त्र परवान्यांची पडताळणी करण्यात आली. त्यात, संबंधितांना कोणताही ठोस धोका, धमकी किंवा कायदेशीर आधार नसल्याचे पोलिसांच्या पडताळणीत आढळून आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता अशा परवान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शस्त्र परवाना प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अर्जदारांची पार्श्वभूमी, परवान्याची गरज, सुरक्षेचा धोका आणि वापर यांची सखोल छाननी केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण २८९ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय, शस्त्र परवाना मिळविण्यासाठी आलेले तब्बल ४७६ अर्ज नाकारण्यात आले आहेत. किरकोळ वाद, सामाजिक असुरक्षितता किंवा कोणताही ठोस पुरावा नसताना करण्यात आलेले अर्ज फेटाळण्यात येत आहेत.
पुण्यात शस्त्र परवाना मिळवायचा असेल, तर प्रत्यक्ष जीवितास धोका असल्याचे पुरावे, पोलिस नोंदी किंवा कायदेशीर कारण आवश्यक ठरणार आहे. केवळ भीती, वाद किंवा अंदाजांवर आधारित अर्जांना आता कात्री लावली जात आहे. खेळाडु वगळता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या कार्यकाळात एकही शस्त्र परवाना मंजूर केला नाही़ शस्त्र परवान्याबाबत त्यांचे कडक धोरण लक्षात घेता पोलीस आयुक्तालयात नवीन परवान्यासाठी अर्ज दाखल होण्याचे प्रमाण शुन्यावर आले आहे.
