Pune Crime News | कौटुंबिक कारणावरून पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून पत्नीवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अटक
पुणे : Pune Crime News | काही कामधंदा न करता पत्नी कामाला जाऊन घर चालवत असताना तिला मारहाण केल्याने तिने पोलिसात तक्रार केली. त्याचा राग मनात धरून पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुंढवा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
साईनाथ कडुबा काळे Sainath Kduba Kale (वय ४५, रा. गणेश पार्क, येवले वस्ती, पेरणे गाव, लोणीकंद) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. सीमा साईनाथ काळे (वय ३८) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत तिचा भाऊ योगेश काकाजी मुरकुटे ( वय ३२, रा. वडगाव शेरी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना केशवनगर येथील पूर्वांकर बिल्डिंगचे सेल्स ऑफिसचे बाहेरील रोडवर १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ व सीमा काळे यांच्या विवाहाला २० वर्षे झाली आहेत. साईनाथ काही कामधंदा करत नाही. सीमा ही नोकरी करून संसार चालवते. मुलांचे सर्व करते. असे असताना साईनाथ तिच्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. याची तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. या गोष्टीचा साईनाथ काळे याला राग होता. सीमा काळे या कामाला गेल्या असताना साईनाथ तेथे गेला. सीमा या घरी निघाल्या असताना त्याने भर रस्त्यात चाकूने त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, दोन्ही हातावर वार करून गंभीर जखमी केले. मुंढवा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साईनाथ काळे याला पकडले. सीमा काळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर तपास करीत आहेत.
