Pune Crime News | शादी डॉट कॉमवर ओळख झालेल्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फायनान्स मॅनेजरला घातला सव्वा कोटींचा गंडा
पुणे : Pune Crime News | शादी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या तरुणाला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून तब्बल सव्वा कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे़
याबाबत एका ४२ वर्षाच्या तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ ही घटना १२ डिसेंबर २०२५ ते २० मे २०२६ दरम्यान घडली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका फायनान्स कंपनीत प्रिन्सीपल नोडल ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांनी शादी डॉट कॉम या वेबसाईटवर लग्नासाठी ऑनलाईन रजिस्टेशन केले होते. त्यातून त्यांची ईशानी मल्होत्रा या तरुणींशी ओळख झाली. त्यांनी एकमेकांना व्हॉटसअॅप नंबर दिला. त्यानंतर त्यांच्यात लग्नाची बोलणी सुरु झाली. तिने फिर्यादी यांना RoboForex विषयी माहिती सांगितली. त्यामध्ये तुम्ही गोल्ड, सिल्वर, क्रिप्टोसाठी इन्वेस्ट करुन शकता, त्यामधून चांगले रिटर्न मिळतील, असे सांगितले. त्यामध्ये मी गुंतवणूक केली असून त्यातून मला चांगले रिटर्न मिळाले असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. २३ डिसेंबर २०२५ मध्ये सर्वप्रथम १ लाख रुपये गुंतविले़ तिच्या सांगण्यावरुन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ते गुंतवणूक करत गेले.
२५ डिसेंबर २०२५ ते २० मे २०२६ पर्यंत ४१ व्यवहाराद्वारे त्यांनी १ कोटी २१ लाख ३६ हजार ७६९ रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांच्या RoboForex अॅपवरील अकाऊंटवर २ कोटी ६ लाख ७६ हजार ३३० रुपये दिसत होते. सहा महिन्याच्या आत गुंतवणूक दुप्पट झाल्याचे पाहून ही त्यांना सुरुवातीला संशय आला नाही. त्यांनी पैसे विड्रॉ करण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांना वारंवार टॅक्स भरावा लागेल, ट्रान्झेक्शन फी भरावी लागेल, अॅडिशनल मार्जीन फी/ क्रेडिट फी भरावी लागेल, अशी वेगवेगळी कारणे देऊन त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. त्यांना शंका आल्याने त्यांनी इंटरनेट व युट्युब वर RoboForex अॅप स्कॅम सर्च केले. त्यावेळी त्यांना एका ठिकाणी एक व्हिडिओ मिळाला. त्यांच्यासारखीच मोडस ओपरेडी सारखा इतर कंपनीचाही फ्रॉड झाला असलेबाबत समजले. आपली ही फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.
