Pune Crime News | सायबर चोरट्यानी क्रेडिट कार्डवरुन 3 लाखांची केली फसवणूक; अॅक्सिस बँकेने 50 हजार रुपये देऊन तक्रार केली क्लोज
पुणे : Pune Crime News | त्यांनी ना ओटीपी शेअर केला, ना कोणाला आपल्या क्रेडिट कार्डचा नंबर सांगितला, तरीही त्यांच्या क्रेडिट कार्डमधून ३ लाख ४ हजार रुपयांचे परस्पर व्यवहार केले गेले. त्यांनी अॅक्सेस बँक कस्टमर केअरला तक्रार केली. बँकेने त्यांना टोकन अमाऊंट म्हणून ५० हजार रुपये देत त्यांची तक्रार क्लोज केली.
याबाबत शिवतीर्थनगर येथील ५८ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी PATM NOIDA याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ मार्च २०२६ रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरदार असून १४ मार्च २०२६ रोजी त्यांच्या मेल आयडीवर क्रेडिट कार्डवरुन एका पाठोपाठ एक असे तीन ट्रान्झेक्शन झाल्याचे मेल प्राप्त झाले. त्यामध्ये १ लाख १ हजार रुपये, १ लाख २ हजार रुपये आणि १ लाख १ हजार रुपये त्यांच्या क्रेडिट कार्डमधून कट झाले. त्यांनी बँक मॅनेजरला १६ मार्च रोजी फोन करुन सर्व हकिकत सांगितली. त्यावरुन त्यांनी फिर्यादी यांचे अकाऊंट १६ मार्च २०२६ रोजी बंद केले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे अॅक्सिस बँक कस्टमर केअर या ठिकाणी तक्रार नोंद केली. ऑनलाईन सगळा व्यवहार बंद केला. त्यानंतर २३ मार्च २०२६ रोजी त्यांनी नवीन क्रेडिक कार्ड अॅप्लीकेशन केले. त्यांचे सर्व ऑनलाईन व्यवहार पुन्हा सुरु केले. त्यांनी त्यांच्या तक्रार अर्जाबाबत बँकेकडे विचारणा केली असता त्यांना योग्य ती माहिती देण्यात आली नाही. तुमची कम्प्लेक्ट आम्ही क्लोज करीत असून बँक आपणास टोकन अमाऊंट म्हणून ५० हजार रुपये देत असल्याबाबत कळविले.
दरम्यान, आपली सायबर फसवणूक झाली असल्याचे समजल्याने त्यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे तक्रार केली. त्यानंतर आता कोथरुड पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असा मेसेज मिळाल्याने त्यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.
