Pune Crime News | विश्रांतवाडीत खून केल्यानंतर टोळक्याने शिवाजीनगर येथे दरवाजावर कोयते मारुन ‘अब बाबा खान का नंबर’ म्हणत पसरविली दहशत, तौफिक शेख व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  विश्रांतवाडी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खुन केल्यानंतर टोळक्याने शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत कोयते दरवाजावर मारुन तोडफोड करत ‘अब बाबा खान का नंबर’ असे म्हणत दहशत माजविली.

याप्रकरणी जुबेदा नजीर खान (वय ४८, रा. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन शेजारी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली  आहे. त्यावरून पोलिसांनी तौफिक शेख, राजन दोरास्वामी, भारत शिंदे व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुक पाहण्यासाठी गौरव गणेश तेलंगी हा येरवडा येथे गेला होता. मिरवणुकीनंतर तो गाडी घेण्यासाठी जात होता. त्यावेळी कॉमरझोन चौकात तौफिक शेख, राजन दोरायस्वामी व त्याचे साथीदार आले. एक वर्षापूर्वी अभिषेक दोरायस्वामी व गौरव तेलंगी यांच्यात शिवाजीनगर येथे भांडणे झाली होती. त्यात अभिषेकच्या हातावर वार  झाले होते. त्या भांडणाच्या रागातून तौफीक शेख व इतरांनी गौरव तेलंगी याच्यावर पालघन, कोयता व सिमेंटच्या विटांनी मारहाण करुन त्याचा खुन केला.

त्यानंतर हे टोळके १५ एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या घराचे दरवाजावर लोखंडी हत्याराने वार करुन दरवाजाचे नुकसान करत दहशत पसरवली. हातातील लोखंडी हत्यारे, लाकडी दांडके हवेमध्ये फिरवत, “अब बाबा खान का नंबर है, बाबा हम उसका गेम करनेवाले है, आम्ही या भागातील भाई आहे. सांगा त्या बाबाला, तौफिक – राजन गँगच्या विरोधात गेला तर त्याला आणि त्याला साथ देणार्‍यांना खल्लास करुन टाकून असे म्हणत दरवाजाचे नुकसान करुन ते निघून गेले. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करीत आहेत.

You may have missed